ब्राझीलमध्ये एक भीषण विमान दुर्घटना झाली आहे. साओ पाउलोजवळ शुक्रवारी 62 जणांना घेऊन उड्डाण केलेले विमान कोसळले. या दुर्घटनेमध्ये विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या प्रादेशिक विमान कंपनी व्होएपासने निवेदन देत याबाबत माहिती दिली आहे.
स्थानिक माध्यम ग्लोबोन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, व्होपास लिन्हास एरिआय या कंपनीचे एटीआर-72 हे विमान पराना राज्यातील कोस्लेवेल शहरातून साओ पाउलोमधील ग्वारुलहोसला जात होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास या विमानाने 58 प्रवासी आणि 4 क्रू सदस्यांसह उड्डाण घेतले होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळाने हे विमान कोसळले. यात सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेचा अंगावर काटा येणारा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दुर्घटनेनंतर विमान कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. साओ पाउलो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ग्वारुलहोसच्या दिशेने मार्गस्थ झालेले डबल इंजिनचे प्रवासी विमान कोसळले असून यात सर्वांचा मृत्यू झाला, अशी माहिती कंपनीने दिली. या विमान दुर्घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही कंपनीने सांगितले.
ब्राझीलमध्ये प्रवासी विमान कोसळलं; 61 जणांचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर pic.twitter.com/DHhofiWqGT
— Saamana (@SaamanaOnline) August 10, 2024
दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार विमानाच्या सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळातच हे विमान शहरी भागात कोसळले. त्यानंतर विमानाला आग लागली.
विमान दुर्घटनांचा सत्र सुरुच
याआधी 24 जुलै 2024 रोजी नेपाळमध्येही विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. काठमांडू विमानतळावरून उड्डाण घेत असताना विमान धावपट्टीवरून घसरले आणि कोसळले. यात 18 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान काठमांडूहून पोखराकडे रवान होत होते.