बेस्टच्या लक्झरी प्रीमियम बसेसना प्रवाशांची पसंती; उपक्रमात आणखी 100 प्रीमियम बस दाखल होणार

ओला-उबरपेक्षा स्वस्त अन् गारेगार अशा बेस्टच्या लक्झरी प्रीमियम बसेसला मुंबईकरांनी पसंती दिली असून मार्चअखेरपर्यंत आणखी 100 प्रीमियम बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपक्रमात दाखल होणार आहेत. या बस ठाणे ते अंधेरी आणि अंधेरी पश्चिम येथील मेट्रो स्टेशन येथील गुंदवली ते बीकेसी, चेंबूर ते कफ परेडदरम्यान धावणार आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

लोकलनंतर मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱया बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत इलेक्ट्रिक वातानुकूलित प्रिमियम बसेस आणल्या आहेत. मुंबईच्या रस्त्यावर 12 डिसेंबरपासून 32 प्रिमियम बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या असून त्यातून दररोज तीन हजारांहून अधिक प्रवाशी लक्झरी प्रवास करत आहेत. सीसीटीव्ही पॅमेरे, पुश बॅक सिट्स, सीट्ससमोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित असल्यामुळे नोकरदार प्रवाशांची या बसला मोठी पसंती मिळणार आहे. ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी, मुंबई विमानतळ ते खारघर, विमानतळ ते कुलाबा, ठाणे ते पवई (हिरानंदानी) दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत आणखी 100 बसेस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार असून आरटीओची परवानगी मिळताच नवीन बस मार्गावर प्रिमियम बसेस सुरू करण्यात येणार आहेत.

उभ्याने प्रवासाला बंदी; सर्व सीट आरक्षित

बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणालीवर भर दिला असून चलो अॅपवर तिकीट काढणाऱया प्रवाशांना प्राधान्य दिले जाते. परंतु प्रिमियम लक्झरी बसने प्रवास करण्यासाठी आधी चलो अॅपवर तिकीट बुकिंग करणे गरजेचे आहे तसेच या बसमध्ये उभ्याने प्रवास बंदी आहे. प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी बस कुठपर्यंत आली, सीट्स आहे की नाहीत, किती वेळात बस इच्छित स्थळी पोहोचणार ही माहिती प्रवाशांना मोबाईलवर उपलब्ध होत असते.