पासपोर्टवरून पत्ता उडणार; आधारचंच महत्त्व वाढणार

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पासपोर्ट आहे, मग त्याची एक कॉपी जोडली की तुमचं कोणतही सरकारी किंवा महत्त्वाच्या कामांसाठी अन्य कागदपत्र जोडण्याची आवश्यकता नसायची. कारण त्यामध्ये फोटो आयडेंटिटी, घरचा पत्ता, जन्मतारीख, सारी माहिती असते. मात्र पासपोर्टचं महत्व कमी होण्याची शक्यता आहे. कारण पासपोर्टवर तुमचा घरचा पत्ता छापला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे असं झाल्यास घरच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारच महत्वाच ठरेल.

पासपोर्टच्या मागच्या पानावर आपला पत्ता दिलेला असतो त्यामुळे आतापर्यंत आपल्याला पासपोर्ट हा राहत्या ठिकाणाचा पुरावा म्हणून दाखवता येत होता. पण या पुढे मात्र पासपोर्ट हो राहत्या ठिकाणाचा पुरावा म्हणून दाखवता येणार नाही कारण केंद्र सरकारने पासपोर्टवर प्रवाशाचा पत्ताच न छापण्याचे ठरविले आहे. पासपोर्टच्या नवीन सिरीजपासून पासपोर्टचे शेवटचे पान हे कोरेच ठेवण्यात येणार आहे.

सध्या पासपोर्टच्या पहिल्या पानावर प्रवाशाचा फोटो व त्याची खाजगी माहिती असते तर शेवटच्या पानावर त्याचा पत्ता दिलेला असतो. मात्र यापुढे पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पत्ता न छापण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे. प्रवासाची खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी परराष्ट्र मंत्रालयाच्या या निर्णयाला मंजूरी मिळालेली आहे. पासपोर्टच्या पुढिल सिरीजपासून पासपोर्टचे मागचे पान कोरे ठेवण्यात येणार आहे.

जुन्या पासपोर्ट धारकांना मात्र त्यांचा पासपोर्ट एक्सपायर होईपर्यंत त्यांचा पासपोर्ट राहत्या ठिकाणाचा पुरावा म्हणून दाखवता येणार आहे. मात्र त्यानंतर नवीन पासपोर्ट त्यांना पुरावा म्हणून सादर करता येणार नाही, अशी माहिती मिळते आहे.

आपली प्रतिक्रिया द्या