पतसंस्थांमधील ठेवींवरील व्याजदर कमी होणार

382

ठेवी वाढत आहेत, मात्र चांगले कर्जदार मिळत नाहीत. त्यामुळे आता पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी ठेवीवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पतसंस्था फेडरेशनचे तालुकाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली. पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची सहाय्यक निबंधक विजयसिह लखवाल यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर इथे बैठक झाली. यावेळी पदाधिकारी याकूब बागवान, अनिरूद्ध महाले, बापूसाहेब जौक, संदिप कोठुळे आदी उपस्थितीत होते.

काळे म्हणाले, पतसंस्थांच्या ठेवीमध्ये व्याज दरात समानता नव्हती. मात्र, आता ती समानता आणण्याचा निर्णय पतसंस्था फेडरेशनने घेतला आहे. पतसंस्थेच्या ठेवी जिल्हा सहकारी बँकेत असल्याने बँकेने व्याजदर एक टक्क्याने कमी केला. त्यामुळे पतसंस्थानीही आपले व्याजदर कमी केले आहेत. आता सामान्य नागरिकांना दहा टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर अर्धाटक्का व्याज जास्त दिले जाणार आहे. कर्जाचा व्याजदार हा १४ ते १६ टक्के राहणार आहे. तारण कर्जाला १४ टक्के, तर विनातारण कर्जाला १६ टक्के व्याजदर असेल. सध्या चांगले कर्जदार मिळत नाहीत. कर्जाची वसूली सरकारच्या आदेशानुसार थांबली आहे. दैनंदिन बचत खातेही ठप्प झाली आहेत. या सर्व परिस्थितीत अडचणी निर्माण झाल्या. करोनाच्या काळात ठेवी व कर्जाचे प्रमाण यातील व्यस्थता वाढत चालली आहे. त्यामुळे ठेवीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

करोनामुळे पतसंस्थांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले. आता खर्चात कपात करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पगारवाढ थांबविण्यात आली असून वाहन खर्च, चहापाणी, कार्यालयीन खर्च हे कमी करण्यात आले आहेत. पतसंस्थांना उलाढालीच्या अडीच टक्के खर्च करण्यास परवानगी होती. मात्र, आता हा खर्च कमी केला जात आहे. ५० कोटींच्या पुढे उलाढाल असलेल्या संस्थांना टीडीएस लागू करण्यात आला आहे. तर पतसंस्थांच्या ठेवी जिल्हा सहकारी बँकेत जमा असतात त्यावर साडेसात टक्के टीडीएस आकारला जातो. ही रक्कम ठेवीदारांकडून कपात करून घेतली जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

करोनामुळे पतसंस्थांपुढील जोखीम वाढली आहे. ही जोखीम कमी करण्याचे प्रयत्न आहेत. पतसंस्थांच्या काही सोने मूल्यांकन करणाऱ्या सराफांनी बनावट सोन्यावर कर्ज दिल्याचे पुढे आले होते. शहरातील पतसंस्थेत हे घडले नाही. मात्र, आता त्याची दखल पतसंस्थांनी घेतली आहे. संबंधित सराफांकडून बँकेची हमी घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या