‘कोरोनील’ची चाचणी अत्यवस्थ कोरोनाग्रस्तांवर केली नाही?

जीवघेण्या कोरोना विषाणूवर लस किंवा औषध शोधण्याचा जगभर प्रयत्न सुरू आहे. 23 जून रोजी बाबा रामदेव यांनी पतंजलीने कोरोनील नावाचे औषध तयार केले असून हे कोरोनावर रामबाण औषध असल्याचा दावा केला होता. मंगळवारी संध्याकाळपर्यंत आयुष मंत्रालयाने या औषधाच्या प्रचार-प्रसारावर स्थगिती आणत सगळ्या तथ्यांची आणि पुराव्यांची तपासणीसाठी मागणी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार या औषधाची चाचणी ही कोरोना झालेल्या गंभीररित्या आजारी रुग्णांवर केली नसून ती किरकोळ लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर केली असल्याचं कळतं आहे.

आयुष मंत्रालयाकडे पतंजलीने त्यांनी औषधाबाबत केलेल्या संशोधनासंदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत. यानुसार या औषधाची 120 रुग्णांवर चाचणी करण्यात आली होती. हे रुग्ण 15 ते 80 वयोगटातील होते आणि ते कोरोनामुळे गंभीररित्या आजारी नव्हते. पतंजली संशोधन संस्था ट्रस्टने आयुष मंत्रालयाला दिलेल्या माहितीमध्ये म्हटलंय की औषधाच्या चाचण्या या जयपूरमधल्या NICR मध्ये करण्यात आल्या होत्या. या चाचण्या सगळ्या नियमांच्या अधीन राहून केल्याचंही पतंजलीने म्हटलं आहे. या चाचण्या करत असताना आयुर्वेद विज्ञान मंडळाच्या महासंचालकांनाही माहिती देण्यात आली होती असंही पतंजलीने म्हटलं आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कोरोनीलसाठी पतंजलीने जी परवानगी मागितली होती ती कोरोनावरील औषध म्हणून मागितली नव्हती ही बाबही उजेडात आली आहे. हे औषध रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, सर्दी, तापावर इलाज म्हणून असल्याचे सांगून परवानगी मागण्यात आली होती. असं उत्तराखंडमझधल्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

‘कोरोनिल’ लाँच केल्यानंतर अवघ्या काही तासांतच केंद्र सरकारने या औषधाच्या बाटलीला बुच लावले आहे. ‘कोरोनिल’च्या जाहिराती तत्काळ थांबविण्याचे आदेश सरकारने पतंजलीला दिले आहेत. ‘कोरोनिल’ची रुग्णांवर चाचणी करण्यासाठी सीटीआयआरकडून परवानगी घेवून सरकारी यंत्रणेची रितसर मान्यता घेतल्याचे रामदेवबाबा यांनी सांगितले. मात्र, केंद्रीय आयुष मंत्रालयाने आदेश काढून ‘कोरोनिल’बाबत केलेल्या दाव्यांची वैद्यकीय पडताळणी करावी लागेल असे म्हटले आहे.

अवघ्या जगात हाहाकार माजविणाऱया कोरोनावर 100 टक्के गुणकारी ‘कोरोनिल’ हे औषध पतंजलीने आज लाँच केले. अवघ्या सात दिवसांत कोरोनाचा रुग्ण ठणठणीत बरा होईल, असा दावा योगगुरू रामदेवबाबा यांनी केला. दरम्यान, व्यासपीठावर रामदेवबाबांसह डॉक्टर्स, संशोधकांची गर्दी होती; पण कोणीही मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नाही. सर्वांचा विश्वास फक्त ‘कोरोनिल’वरच असल्याचे दिसून आले.

हरिद्वार येथील पतंजली योगपीठ येथे लॉचिंग सोहळा पार पडला. रामदेवबाबा, आचार्य बाळकृष्ण यांच्यासह ‘एम्स’मधील डॉक्टर्स उपस्थित होते. 280 रुग्णांवर ‘कोरोनिल’च्या कि।निकल टेस्ट करण्यात आल्या. त्यातील कोरोना पॉझिटिव्ह असलेले 61 टक्के रुग्ण तीन दिवसांत बरे झाले. तर 100 टक्के रुग्ण सात दिवसांत बरे झाले. मृत्यूदर शून्य टक्के आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या