शीतल तेजवानीचा सुटकेचा मार्ग मोकळा, खडक पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी हायकोर्टाकडून सशर्त जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजितदादा पवार गटाचे खासदार पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शीतल तेजवानीला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज दिलासा मिळाला आहे. पिंपरी आणि बावधन पोलीस ठाण्यांतील गुन्ह्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी सोमवारी शीतल तेजवानीची खडक पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी सशर्त सुटका केली. तिन्ही प्रकरणांत जामीन मिळाल्याने शीतल तेजवानीचा येरवडा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीला ३ डिसेंबर रोजी अटक केली होती. त्याच प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला तसेच खडक पोलीस
ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर आहे, पोलिसांनी नोटीस न देताच अटक केली असा दावा करत शीतल तेजवानी हिने हायकोर्टात अॅड. अजय भिसे व अॅड. दीपाली केदार यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती, तर सेवा विकास सहकारी बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. बावधन आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी अटकेची कारणे तिला अटक करतेवेळी किंवा न्यायालयात हजर करण्यापूर्वी कळवण्यात आली नव्हती असे स्पष्ट करत दोन गुन्ह्यांप्रकरणी यापूर्वीच हायकोर्टाने जामीन दिला होता तर खडक पोलीस ठाण्यातील एफआयआरप्रकरणी तेजवानीने जामिनासाठी हायकोर्टात याचिका केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा न्यायालयाने २ लाखांच्या जातमुचलक्यावर तेजवानीची सुटका केली.