‘फिल्म चलेगा हॉल जलेगा’: बिहारमध्ये ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर फाडले, इंदुरमध्ये हनुमान चालिसा पठण

pathaan-movie-poster

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या गाण्यावरून चांगलाच वाद रंगला होता. त्यामुळे पठाण चित्रपटाविरोधात मोहीम उभी राहिली. आता चित्रपटाच्या रिलीजच्या एक दिवस आधी, मंगळवारी बिहारमधील भागलपूरमध्ये एका सिनेमागृहाबाहेर ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले आणि जाळण्यात आले. बजरंग दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर निदर्शने केली, चित्रपटाचे पोस्टर फाडले आणि ‘फिल्म चलेगा हॉल जालेगा’ अशा घोषणा देण्यात आल्या.

शाहरुखचा पठान हा भागलपूरच्या दीपप्रभा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

‘आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. फिल्म चलेगा तो हॉल जालेगा (चित्रपट प्रदर्शित झाला तर चित्रपटगृह जाळून टाकू) असा इशारा यावेळी चित्रपटगृहाच्या मालकांना देण्यात आला. पठाण चित्रपटावर देशभरात बहिष्कार टाकण्यात येत आहे. भगव्या रंगाचा अपमान करणारा चित्रपट चालू देणार नाही’, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

‘हिंदुत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भागलपूरसह संपूर्ण देशामध्ये सनातन संस्कृतीला विरोध करणाऱ्या कोणत्याही घटकाला खपवून घेतले जाणार नाही’, असे आंदोलकांनी सांगितले. व्यवस्थापक लालन सिंग यांनी सांगितले की, काही जणांनी चित्रपटाला विरोध करत पोस्टर जाळले, अशी माहिती एएनआयला दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘स्थानिक पोलीस ठाणे आणि एसपींना अर्ज देण्यात आला असून, प्रशासनाने सुरक्षा दिली जाईल’, असे आश्वासन दिले आहे.

इंदुरमध्ये हनुमान चालिसा पठण

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाविरोधात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हिंदू गटांनी चित्रपटगृहांबाहेर निदर्शने केली. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हनुमान चालिसाचे पठण करताना दिसले. आंदोलकांनी चित्रपटगृहाबाहेर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.