पाथर्डीमध्ये दमदार पाऊस; बळीराजा सुखावला, कपाशीच्या लागवडीस सुरुवात

महाराष्ट्रामध्ये पावसाचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दिवसभर झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून अनेक गावांना टँकरणे होणारा पाणिपुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेली तीन वर्ष तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक टँकरचा तालुका म्हणून पाथर्डी तालुका ओळखला जात होता. मात्र यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दोन दिवस पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर शहरासह तालुक्याच्या पूर्व भागात अधिक होता. पूर्व भागातील टाकळीमानूर, येळी, खरवंडी, कासार आणि अकोले या भागांमध्ये पाऊस पडला, तर तालुक्याच्या पश्चिम भागात करंजी, देवराई, सातवड, भोसे या भागांमध्ये चांगला पाऊस पडला. त्यामुळे नदी, नाले, ओढे वाहू लागले आहेत. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

तालुक्यातील सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. खरवंडी परिसरात झालेल्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीस सुरुवात केली आहे. तसेच तालुक्याच्या पश्चिम भागातील काही भागांमध्ये कपाशीच्या लागवडीस सुरुवात करण्यात आली आहे. शहरात सुद्धा चांगला पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.