पाटीलबुवांच्या कथित चमत्कारांची डायरी पोलिसांच्या हाती

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

झरेवाडी येथील भोंदू पाटीलबुवा याने केलेल्या कथित चमत्कारांची माहिती नमूद असलेल्या डायऱ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पाटीलबुवा याला जादूटोणा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यामुळे डायरीतील मजकूर हा त्याच्याविरोधातील पुरावा म्हणून न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे.

श्रीकृष्ण पाटील उर्फ पाटीलबुवा याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाटीलबुवा शिवीगाळ करताना तसेच नाचताना दिसला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाटीलबुवाचे अनेक प्रताप उघड झाले. एका महिलेने पाटीलबुवाविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली. अखेर पोलिसांनी महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी पाटीलबुवाला अटक केली. त्याच्या विरोधात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पाटीलबुवाला न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी पाटीलबुवाचा मठ, त्याची सर्व बँक खाती इथे तपास सुरू केला आहे. पाटीलबुवाशी संबंधित व्यक्तींकडे चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही डायऱ्या लागल्या आहेत. या डायऱ्यांमधून पाटीलबुवा विरोधात महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.