पाटलीपुत्र एस्प्रेसवर दरोडा, एका दरोडेखोराला अटक

41

सामना प्रतिनिधी । कल्याण

मुंबईहुन पाटना येथे जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेसवर सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. तिघा दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून शंभरहुन अधिक प्रवाशांजवळील रोख रक्कम, मोबाईल, सोनसाखळी असा अंदाजे ८ लाखांचा मुद्देमाल लुटला आहे. कल्याण ते इगतपुरी दरम्यान एक तास लूटमार सुरू होती. अखेर जीवावर उदार होऊन काही धाडसी प्रवाशांनी या दरोडेखोरांचा प्रतिकार केला. यातील एकावर झडप घालून पकडले. श्रावण तेलम (२०) असे या दरोडेखोरांचे नाव आहे. कल्याण जीआरपी आणि आरपीएफची विविध तपास पथके उर्वरीत दोघा दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला येथून पाटना येथे निघालेली पाटलीपुत्र एक्सप्रेस मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांनी कल्याण स्थानकात आली. कल्याणहुन ट्रेन सुटताना २५ ते ३० वयोगटातील ३ दरोडेखोर पटापट जनरल डब्यात घुसले. काहिंनी कान टोप्या आणि हातात मोजे घातल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी पोलिसांना सांगितले. या डब्यात शंभर ते दीडशे प्रवासी होते. बरेच प्रवासी गाढ झोपेत होते. कल्याणहुन गाडी सुटल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच दरोडेखोरांनी झोपलेल्या प्रवाशाच्या खिशात हात घालून पैसे खेचायला सुरुवात केली. जे विरोध करत होते त्यांना मारहाण केली जात होती. ट्रेनमधुन बाहेर फेकण्याची धमकी दिली जात होती. अनेकांच्या गळ्याला धारधार चाकू लावुन पर्स, बैगमधील रोख रक्कम, मोबाईल, सोनसाखळी, अंगठी अशी जी मिळेल ती लूट सुरू होती. जवळपास एक तास दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू होता. दरम्यान काही प्रवाशांनी डब्यातील चेन खेचली. पुढे जाऊन गाडीची गती कमी झाल्यानंतर यातील दोघे उडया टाकून अंधाराचा फायदा घेऊन पसार जाले. मात्र तत्पूर्वीच काही धाडसी प्रवाशांनी श्रावण तेलम याला झडप घालून पकडले. यानंतर इगतपुरी स्थानकात ही एक्सप्रेस थांबली. यावेळी प्रवाशांनी एकच गोंधळ सुरू केला. गोंधळ ऐकूण गार्ड डब्यात आल्यानंतर घडला प्रकार समजला. तातडीने गार्डने पोलिसांना डब्यात पाचारन केले. पोलिसांनी श्रावण तेलम याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे धारधार हत्यारे मिळून आली. प्रवासी प्रचंड भितीच्या छायेत होते. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस बंदोबस्तात पाटन्याच्या दिशेने पाटलीपुत्र एक्सप्रेस रवाना जाली. इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात उदय यादव या प्रवाशाने दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी श्रावण तेलमसह पसार झालेल्या दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपासासाठी हा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

२० डिसेंबर घटनेची पुनरावृत्ती

याच पाटलीपुत्र एक्सप्रेसवर २० डिसेंबर २०१६ रोजी १५ ते २० दरोडेखोरानी दरोडा टाकला होता. कल्याण ते कसारा दरम्यानच ही लूटमार झाली होती. यातील दोघे दरोडेखोर आताच्या लुटित सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

लुटारू परप्रांतीय

कल्याण रेल्वे स्थनकात पाटलीपुत्र एक्सप्रेस थांबल्यानंतर ज्या डब्यात लुटारु घुसले तेथील महत्वाची सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यातील लुटारू परप्रांतीय असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या