पावलो ट्रव्हल्सचे सर्वेसर्वा मारियो परेरा यांचे निधन

पावलो ट्रव्हल्सच्या माध्यमातून देशभर प्रवासी वाहतुकीचे जाळे उभारणारे म्हापशाचे सुपुत्र मारियो सुकूर परेरा (62) यांचे कोरोनामुळे निधन झाले. पावलो ट्रव्हल्समधून त्यांनी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. परेरा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारही चालू होते, मात्र त्यातून ते सावरू शकले नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मायरन असा परिवार आहे. परेरा यांच्या निधनानंतर ‘गोव्याचा खरा सुपुत्र हरपला’, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.

परेरा यांनी पावलो हॉलिडे मेकर्सच्या ब्रॅण्डखाली पावलो ट्रव्हल्स ही प्रवासी वाहतूक करणारी कंपनी सुरू केली. गेली 20 वर्षे ही कंपनी दक्षिण हिंदुस्थानातील राज्ये आणि महाराष्ट्रात गोव्याची ओळख बनली आहे. मारियो परेरा यांचं पार्थिव शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. अंत्ययात्रेवेळी पावलो ट्रव्हल्सच्या सर्व लक्झरी बसेस एका रांगेत शववाहिकेच्या मागून सोडण्यात आल्या. बसचालकांनी सलग हॉर्न वाजवत आपल्या लाडक्या मालकाला विशेष मानवंदना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या