पवना धरण ६० टक्के भरले, पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर

196

सामना ऑनलाईन ।पिंपरी

पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. या परिसरात गेल्या २४ तासांत १०८ मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकूण १५१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडची जीवनदायिनी असणारे पवना धरण साठ टक्के भरले आहे.

पिंपरी-चिंचवड परिसराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. जून महिन्यात धरणातील पाणीसाठा २० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. यामुळे महापौर नितीन काळजे यांनी पिंपरी-चिंचवडला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी हा निर्णय टँकर लॉबीसाठी घेतल्याचा आरोप होत होता. जनआंदोलन उसळू नये या भीतीने सत्ताधाऱ्यांनी समयसूचकता दाखवून जूनच्या पहिल्या आठवड्यात थोडा पाऊस झाल्यानंतर ही पाणीकपात मागे घेतली आणि नियमितपणे केली जाणारी दहा टक्के पाणीकपात कायम ठेवली.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस झाला आहे. पहिल्या आठवड्यात पाऊस चांगला झाला होता मात्र पुन्हा काही दिवस पाऊस गायब झाला. गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाची दमदार बॅटींग सुरू झाली. रविवारी २४ तासांत १०८ मिमी पावसाची नोंद झाली. पवना परिसरात एक जूनपासून पंधरा मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याचा परीणाम म्हणून पवना धरणातील पाणीसाठा गेल्या ४५ दिवसांत ३९ टक्क्यांनी वाढला आहे तर गेल्या तीन दिवसात अकरा टक्के पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणात सध्या तीन टीएमसी उपयुक्त पाणी आहे. मावळात जोरदार पाऊस सुरू असल्याने धबधबे ओसंडून वाहायला लागले आहेत तसेच पवना, इंद्रायणी या नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या