पवई तलावात सांडपाणी सोडणार्‍यांची खैर नाही

चौकशी करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश
मुंबई – पवई तलावात आजूबाजूच्या निवासी वसाहती तसेच रेनिसन्स हॉटेल अन्य कारखान्यांचे सांडपाणी सोडले जात असल्याची बाब स्थायी समिती अध्यक्षांसह अन्य सदस्यांनी केलेल्या पाहणी दौर्‍यात निदर्शनास आली. याप्रकरणी संबंधित आस्थापनांची ओसी रद्द करण्याचे आदेश दिले असतानाच याचे पडसाद आज स्थायी समिती बैठकीत उमटले. याप्रकरणी दोषी पालिका अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली असता या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले.

शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी पवई तलावाला धोका निर्माण झाल्याबद्दलचा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला स्थायी समितीतील सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. हिरानंदानी वसाहतीतील इमारतींचे सांडपाणी तलावात सोडले जात असून त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही, असे कोरगावकर यांनी विचारले. तलावाचे नुकसान करणारे तसेच त्यांना मदत करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मनसेचे संतोष धुरी यांनीही त्यांना पाठिंबा दिला. येथील हॉटेलला परवानगी कशी दिली याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. तलावात सांडपाणी सोडणे पूर्णपणे बंद करावे असे भाजपचे दिलीप पटेल म्हणाले. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळानेही तलावातील प्रदूषणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले.

हाऊस बोटी होणार बंद
पवई तलावात हाऊस बोट उलटून तीन जणांचा मृत्यू झाला. स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी निवासी बोटी बंद करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली. याप्रकरणीही चौकशीचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत. दरम्यान या प्रकरणी बोटीच्या मालकांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येथील बोटी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.