सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना काजू व आंबा फळपिक विमा रक्कम तात्काळ अदा करा – शिवसेना गटनेते नागेंद्र परब

या वर्षी वातावरणातील बदल तसेच अतिवृष्टीमुळे काजू व आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे बागायतदार, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू व आंबा शेतकऱ्यांनी फळपिक विमा उतरविलेला आहे, त्यांना तातडीने रक्कम अदा करण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांनी मंगळवारी जिल्हा कृषी अधिकारी म्हेत्रे यांच्याकडे केली आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना अद्याप विमा रक्कम प्राप्त झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

या वर्षी काजू व आंबा हंगामामध्ये वातावरणात वेळोवेळी बदल होत गेले. तसेच अवेळी अतिवृष्टी झाल्यामुळे काजू व आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे काजू व आंबा शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काजू व आंबा शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या काजू व आंबा शेतकरी बांधवांनी फळपिक विमा उतरविलेला आहे. त्यांना अद्याप विमा रक्कम मिळाली नसल्याने ते शेतकरी हतबल झालेले आहेत.

शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत जि. प. सदस्य तथा शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी वेताळबांबर्डे परिसरातील काजू व आंबा शेतकरी यांच्या उपस्थितीत जिल्हा कृषी अधिकारी म्हेत्रे यांची मंगळवारी भेट घेत संबधित विमाधारक शेतकऱ्यांना काजू व आंबा पिकाची विमा रक्कम तात्काळ अदा करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे काजू व आंबा शेतकऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष वेधले. यावेळी राज्य कमिटीचे सदस्य बाजीराव झेंडे, हिर्लोक किनळोसचे उपसरपंच नरेंद्र राणे, माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, प्रगतशील शेतकरी विनोद सावंत आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या