रुग्णालय उपचाराचा खर्च व्याजासह द्या; कोरोनातील बिल नाकारल्यानंतर ग्राहक न्यायालयाचे स्टार हेल्थ कंपनीला आदेश

तालुक्यातील नंदगाव येथील दाम्पत्याला कोरोना काळात उपचार घेण्यासाठी लागणारा खर्च 91 हजार 847 रुपये व 2021 पासून त्यावर सात टक्के व्याज, मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये स्टार हेल्थ कंपनीने द्यावे, असे आदेश धुळे जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

योगेश भटा पाटील व अश्विनी योगेश पाटील (रा. नंदगाव ता. अमळनेर) यांनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या धुळे शाखेमधून पूर्ण परिवाराची पाच लाखांची विमा पॉलिसी काढलेली होती. कोरोना काळात अश्विनी पाटील यांना कोरोनाची लागण होऊन निमोनिया झाला होता. त्यांच्यावर बालाजी कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रुग्णालयातून सुटका होऊन पती योगेश पाटील यांनी विमा कंपनीकडे मेडिकल बिलासाठी दावा दाखल केला होता. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शकसूचनेनुसार अश्विनी पाटील यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची आवश्यकता नव्हती, म्हणून विमा कंपनीकडून मेडिकल बिल मागणीसाठी करण्यात आलेला दावा नाकारण्यात आला होता. त्यामुळे योगेश पाटील यांनी अॅड. चंद्रकांत येशीराव व अॅड. धनश्री येशीराव यांच्यामार्फत धुळे येथील ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

यावेळी आयोगाच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश नीता देसाई व सदस्या रसिका निकम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर डॉक्टरांना अॅडमिट करून घेण्याची आवश्यकता असल्यानेच दाम्पत्यावर अॅडमिट करून उपचार करण्यात आले आहेत. असे ग्राह्य धरले. शिवाय कंपनीने ज्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेऊन विमा नाकारला होता. त्यासंदर्भात कंपनीने कोणतेही कागदपत्रे आयोगाला सादर केलेले नाहीत. म्हणून विमा कंपनीने दाम्पत्याला उपचारासाठी आलेला खर्च 91 हजार 847 रुपये, तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल पाच हजार रुपये दंड व तक्रारी अर्जासाठी पाच हजार रुपये खर्च, तक्रार दाखल झाल्यापासून संपूर्ण रकमेवर सात टक्के व्याजाप्रमाणे येणारी रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत.