बोनसच्या नावाखाली महिला पोलिसाची केली फसवणूक

309

पेटीएम खात्यात बोनस जमा झाल्याच्या भूलथापा मारून भामटय़ाने महिला पोलिसाची फसवणूक केली आहे. तक्रारदार या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. रविवारी त्या डयुटीवर होत्या. तेव्हा त्यांना मोबाईलवर फोन आला. तुमच्या पेटीएम खात्यात बोनस जमा झाला आहे. मेसेज रिसिव्ह केल्यावर खात्यात पैसे जमा होईल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी फोन कट केला. त्यानंतर त्यांना मोबाईलवर पुन्हा फोन आला.

तेव्हाही त्यांनी फोन कट केला. काही वेळानी त्यांना पुन्हा फोन आला. आम्ही फ्रॉड केलेले नाही, तुम्ही पेटीएम वरून व्यवहार केला आहे. त्यामुळे तुम्हाला बोनस देत आहोत असे भासवले. त्यानंतर आणखी एकाने त्यांना फोन केला. तुम्ही आमचा मेसेज का रिसिव्ह करत नाहीत. मेसेज रिसिव्ह करा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदार या काही वेळाकरता गोंधळल्या होत्या. त्यांनी मेसेज रिसिव्ह करून एक लिंक उघडली. लिंक उघडल्यानंतर त्यांना मोबाईलवर मेसेज आला. त्याच्या खात्यातून 1 लाख 30 हजार रुपये काढले गेले. याप्रकरणी त्यांनी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या