पेटीएम, नायकाच्या शेअरने गुंतवणूकदारांना रडवले; 100 दिवसात निच्च्यांकी स्तरावर

गेल्या काही दिवसापासून जागतिक शेअर बाजार मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यातच अमेरिकेच्या बाजारात अशुभ मानला जाणारा डेथ क्रॉस पॅटर्न तयार झाला आहे. त्यामुळे बाजारात मोठी मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्या नवीन लिस्ट झालेल्या टेक कंपन्यांनी गुतंवणूकदारांना रडवले आहे. पेटीएम आणि नायकाच्या शएअरने सोमवारी नवी निच्च्यांक गाठत नवा रेकॉर्ड केला आहे. या कंपन्यांचे आयपीओ आल्यानंतर काही काळ नायकाचा शेअर दमदार वाटचाल करत होता. मात्र, आता त्याने निच्चांक गाठला आहे. तर आयपीओ आल्यानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या शेअरचे काय करायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.

सोमवारी पेटीएमचा शेअर 2 टक्क्यांनी घसरत 815.10 रुपयांवर आला आहे. हा पेटीएमचा 52 आठवड्यातील निचांकी स्तर आहे. आता हा शेअर ऑल टाईम हाय म्हणजे 1,961.05 च्या तुलनेत 58 टक्क्यांनी खाली आला आहे. सोमवारी बाजार सुरू होताच या शेअरमध्ये घसरणीला सुरुवात झाली. याआधी शुक्रवारी तो 833.50 रुपयांवर बंद झाला होता. बाजाराची सुरुवात होताच तो 830 रुपयांवर आला आणि त्यानंतर त्यात घसरण होत तो 815.10 रुपयांवर आला आहे. या कंपनीचा एमकॅप 55 हजार कोटींच्या खाली आला आहे.

नायकाचा शेअर सोमवारी 5 टक्क्यांनी घसरत 1,327.20 रुपयांवर आला आहे. या घसरणीमुळे पहिल्यांदाच कंपनीचा एमकॅप 65 हजार कोटींच्या खाली आला आहे. या शेअरची सुरुवातही सोमवारी घसरणीने झाली. याआधी तो 1,399.25 रुपयांवर होता. बाजार सुरू होताच तो 1,395 रुपयांवर आला आणि 1,327.20 रुपयांपर्यंत घसरला. हा शेअर त्याच्या 2,574 या ऑल टाईम हायपेक्षा 49 टक्क्यांनी कमी झाला आहे.

या दोन शेअरमध्ये झालेल्या घसरणीने यात गुंतवणूक केलेले अनेकजण रडकुंडीला आले आहेत. आता नुकसानीत हे शेअर विकता येत नसल्याने ते कधीपर्यंत ठेवायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. काही तज्ज्ञांनी जागतिक बाजाराचा आणि रशिया-युक्रेन तणावाचा बाजारावर परिणाम झाला आहे. मात्र, काही तज्ज्ञांनी पेटीएमच्या शेअरमध्ये येत्या काही महिन्यात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.