पिंपरीच्या नव्या महापौरांची मंगळवारी निवड होणार 

35

सामना ऑनलाईन । पिंपरी

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नव्या महापौराची मंगळवारी (दि.१४) निवड होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. सभागृहातील संख्याबळ पाहता भाजप उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तर, बिनविरोध निवड होण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचे प्रयत्न सुरु आहेत.

महापौरपदासाठी  भाजपने नितीन काळजे यांना तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादीकडून शाम लांडे आणि निकिता कदम यांनी महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. पिंपरी – चिंचवड महापालिकेत १२८ नगरसेवक आहेत. भाजपचे ७७, राष्ट्रवादीचे ३६, शिवसेनेचे ९ आणि अपक्ष ५ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे संख्याबळ पहाता  भाजपच्या महापौर आणि उपमहापौर दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे.

महापालिका सभागृहात मंगळवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रथम महापौर आणि उपमहापौर पदाच्या अर्जांची छाननी होणार आहे. वैध नामांकनानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनीटे दिली जाणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्यास नगरसेवकांनी हात वर करुन आपले मत नोंदवायचे आहे. ज्या उमेदवाराला जास्त मते पडतील त्याला महापौर घोषीत करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. महापौरांच्या निवडीनंतर याच पद्धतीने उपमहापौरांची निवड केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या