नाचला गं मोर

977

योगेश नगरदेवळेकर

रुबाबदार… देखणा मोर…! त्याचे बहुरंग, त्याचे नृत्य… आणि क्वचित त्याचे गोरेपान असणे सारेच न्यारे…!

बालपणात गाण्यातून विविध पक्ष्यांची ओळख होत असते. ‘इथे इथे बस रे मोरा’ यातून आपल्याला पहिल्यांदा मोर भेटतो. आपण इंठाजीमध्ये त्याला सर्रास पीकॉक म्हणतो, परंतु तो पीफाउल आहे. ‘पावो क्रिस्टाटस’ हे त्याचं नाव. एकंदरीतच आपल्या असं लक्षात येईल की हा कोंबडय़ा, तितरसारखा जमिनीवर वावरणारा पक्षी आहे. अशातच त्यांची फॅमिली फॅसिसानिडी आहे.

मोराच्या डोक्यावर तुरा असतो तसा मादीच्या म्हणजेच लांडोरीच्या डोक्यावर असतो. मादीला पिसारा नसतो. यामुळे मोर आणि लांडोर यातील फरक ओळखता येतो. मोर पिसारा फुलवून नाचतो ते मानवाने त्याचं कौतुक करावं म्हणून नाही तर त्याचा हा दिमाखदार नाच लांडोरीने त्याच्याकडे आकृष्ट व्हावे यासाठी असतो. नाचताना तो पिसारा पूर्ण फुलवतो. त्या पिसऱयावरून उजेड कसा परावर्तित होऊन पिसारा अजून सुंदर दिसेल याचं त्याला भान असतं.

आपली संतती अधिक सुदृढ व्हावी यासाठी लांडोर त्यातल्या त्यात सुंदर पिसाऱयावाल्या नराला निवडते. लांडोर एकावेळी ५ अंडी घालते साधारणपणे महिनाभरात त्यातून पिल्लं बाहेर येतात. लहान पिल्लं मात्र दिसायला अगदी कोंबडीच्या पिल्लांसारखी असतात. आपली नखं जशी वाढतात तशी पिसाऱयाची पिसं वाढतात आणि कालांतराने गळून पडतात. मोराचे पाय मात्र त्याच्या इतर दिमाखापेक्षा विसंगत काटकुळे असतात पण बळकट असतात त्याला फारसं उडता येत नसल्याने शत्रूपासून बचावासाठी त्याचा त्याच्या पायावरच विश्वास असतो. दोन नरांच्या भांडणात या पायांवरील तीक्ष्ण नख्यांचा प्रतिस्पर्ध्याला जखमी करण्यासाठी उपयोग केला जातो.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोरांचा आढळ आहे. साधारणपणे डोंगराच्या पायथ्याच्या जंगलात मोर राहतात. पुणे जिल्हय़ातील शिरूर तालुक्यात ‘मोरांची चिंचोली’ नावाचे गाव आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात जवळून मोर पाहायला मिळतात. कराडजवळ मोरगिरी नावाचा किल्ला आहे. त्या गावातही विपुल मोर बघायला मिळतात. पूर्वीपासूनच हिंदुस्थानी उपखंडात मोरांचे वास्तव्य असल्याने मोर देवतांशीही जोडला गेला आहे. सरस्वती देवी आणि कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे. तर श्रीकृष्णाचे चित्र त्याच्या डोक्यावरील मोर पिसाशिवाय अपूर्ण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या