भरधाव बेस्ट बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक देत एका पादचाऱ्याला चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रभादेवी येथील एन एम जोशी मार्गावर ही घटना घडली. ज्ञानेश्वर नामदेव दिघे असे मयत पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एन एम जोशी मार्ग पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अमीन शेख असे अटक चालकाचे नाव आहे.
दिघे यांचा खरवस बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय होता. दिघे हे खरवस खरेदीसाठी जात असताना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. एन एम जोशी मार्गावरील विनायक सदन बिल्डिंगजवळ भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बसने एका थांबलेल्या कारला धडक दिली आणि त्यानंतर फूटपाथवरून चालत असलेल्या दिघे यांना धडक दिली.
या अपघातात दिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुदैवाने बसमधील प्रवासी सुखरूप बचावले. बसने धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच अधिकाऱ्यांना मिळताच एन एम जोशी मार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बसचालक अमीन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. नंतर नोटीस बजावून त्याला सोडून देण्यात आले.