तरुणाला मारहाण करून कचरा खायला लावला, जोगेश्वरी पूर्व परिसरातील घटना

पूर्वीच्या वादातून तरुणाला मारहाण करून कचरा खायला लावल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तन्वीर शेख असे त्या जखमी तरुणाचे नाव असून त्याला मारहाण करणाऱया फईम शेखला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. तर फईमच्या दुसऱया साथीदारांचा मेघवाडी पोलीस शोध घेत आहेत.

तन्वीर आणि फईम हे दोघे जोगेश्वरी परिसरात राहतात.  काही दिवसांपूर्वी तन्वीरने फईमचा साथीदार खलिफ शेखला मारहाण केली होती.  मारहाणीबाबत वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दहा दिवसांपूर्वी तन्वीर हा रामगड अमन चौक येथून जात होता तेव्हा फईम आणि खलिफने तन्वीरला थांबवले. जुन्या वादातून त्या दोघांनी तन्वीरला मारहाण केली. एवढय़ावरच न थांबता त्या दोघांनी तन्वीरला कचरापुंडीत बसवून कचरादेखील खायला लावला.

तेव्हा घटनास्थळी उपस्थित असणाऱयांकडे तन्वीर मदतीसाठी याचना करत होता, मात्र रागाच्या भरात असलेल्या त्या दोघांनी तन्वीरला कचरापुंडीत झोपण्यास सांगितले. त्या घटनेनंतर तन्वीरने कशीबशी सुटका करून मेघवाडी पोलीस ठाणे गाठले. तन्वीरच्या तक्रारीवरून मेघवाडी पोलिसांनी फईमविरोधात मारामारीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. फईमला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तन्वीरला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या