हमासने आणखी सहा ओलिसांना ठार मारल्यानंतर इस्रायलमध्ये पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. लाखो इस्रायली नागरिक रस्त्यावर उतरले असून युद्ध थांबवा, तुमची रक्तपिपासू वृत्ती चालणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देत निदर्शने केली जात आहेत. रविवारी रात्रीपासून विविध शहरांमध्ये सुमारे 5 लाख लोकांनी रस्त्यांवर ठाण मांडले आहे. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, राजधानी तेल अवीवमध्ये 3 लाखांहून अधिक आणि इतर शहरांमध्ये जमलेले 2 लाखांहून अधिक लोक युद्ध थांबवण्याची आणि नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. नेतन्याहू यांच्या घराबाहेरही निदर्शने करण्यात आली.
इस्रायलमधील सर्वात प्रबळ कामगार संघटना जनरल फेडरेशन ऑफ लेबरने पुकारलेला सोमवारपासूनचा संप येथील कोर्टाने बेकायदा घोषित केला असला तरी निदर्शने सुरूच आहेत. नेतन्याहू युद्धविराम करार करत नसल्याने लोकांमध्ये संताप वाढला आहे. युद्ध थांबवून उर्वरित 97 ओलिसांची सुटका करण्याची मागणी आंदोलक नेतन्याहू यांच्याकडे करत आहेत.
नेतन्याहू ओलिसांच्या सुटकेसाठी, गाझामधील युद्धविराम करारासाठी पुरेसे प्रयत्नशील नाहीत, अशी नाराजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही व्यक्त केली आहे.
इस्रायलला केला जाणारा काही शस्त्रांस्त्रांचा पुरवठा स्थगित करण्याचा निर्णय ब्रिटनने जाहीर केला आहे.