गेल्या दोन महिन्यांपासून शिवडीतील विविध प्रभागांमध्ये पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांसह शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला तरी आश्वासनांपलीकडे रहिवाशांना काहीच मिळाले नाही. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत डोळेझाक करणाऱ्या पालिका आणि मिंधे सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विभागातील महिलांचा, शिवसैनिकांचा आणि रहिवाशांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
शिवडी विधानसभा मतदारसंघातील विविध विभागामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड पाणीटंचाई होत असून रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. रहिवाशांच्या अनेक तक्रारी आमदार अजय चौधरी यांच्याकडे आल्या आहेत. त्या तक्रारी त्यांनी जल विभाग, एफ दक्षिण विभागाकडे पाठविल्या, परंतु आश्वासनाशिवाय काहीही कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी विभाग संघटक किशोरी पेडणेकर, विधानसभा संघटक सुधीर साळवी, विधानसभा संघटिका लता रहाटे, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, विधानसभा समन्वयक गौरी चौधरी, उपविभाग संघटक रूपाली चांदे, माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका सिंधू मसुरकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सचिन पडवळ, शाखाप्रमुख मिनार नाटाळकर, किरण तावडे, जयसिंग भोसले, हनुमंत हिंदोळे, गोपाळ खाडये, विजय भणगे, शैलेश माळी, शाखा संघटक शारदा बाणे, भारती पेडणेकर, कांचन घाणेकर, शुभदा पाटील, माई आरोळकर, शाखा समन्वयक दिव्या बडवे, कल्पना ओव्हळे, समीक्षा परळकर उपस्थित होते.
दसऱ्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करा
आमदार अजय चौधरी यांची एफ दक्षिण कार्यालयात सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासोबत यावेळी बैठक पार पडली. शिवडी विधानसभेतील अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या दसऱ्यापूर्वी सोडवा अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि एफ दक्षिण कार्यालयाला टाळे लावण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेतर्फे देण्यात आला.