जामीनावर असलेल्यांनी ‘एन्जॉय’ करावे, आम्ही कायद्यानुसार कारवाई करू; मोदींचा इशारा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भ्रष्टाचाराविरोधात सरकारची लढाई सुरूच राहील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आम्ही अजूनही कोणाला तुरुंगात का पाठवले नाही, असा सवाल आम्हाला विचारण्यात येत आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणालाही उचलून तुरुंगात टाकता येणार नाही. त्यामुळे जामीन मिळाला आहे, त्यांनी त्याचा आनंद घ्यावा, आम्ही त्यांच्याविरोधात कायद्यानुसार कारवाई करू. कोणालाही तुरुंगात टाकण्यासाठी अयोग्य मार्ग निवडण्याची गरज नाही. कायदा आपले काम करेल असे ते म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. राष्ट्रपतींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण पू्र्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहनही मोदींनी केले. देशाच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक संकटाचा सामना करायचा आहे. अनुभवी खासदारांनी आपला दृष्टिकोन मांडणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

आमची उंची कोणी गाठू शकत नाही. आम्ही कुणाची रेघ लहान करण्यात वेळ घालवत नाही, उलट स्वत:ची रेघ मोठी करण्यात आयुष्य वेचतो. आमच्या सरकारला केवळ 3 आठवडे झालेत, पण अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. पाण्याच्या संकटाची आमचे सरकार गांभीर्याने दखल घेत आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीतल्या पारंपरिक पद्धतींतून आपण बाहेर यायला हवे. यंदा आम्ही जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली आहे. जलसंकटास आपल्याला गंभीरतेने घ्यावे लागणार आहे, असे ते म्हणाले. आधीच्या युपीए सरकारपासून मुक्तता मिळवण्यासाठी आम्हाला जनतेने 2014 मध्ये निवडून दिले, पण यावेळी आमची पाच वर्षांतली कामे पाहून आम्हाला मागील वेळेपेक्षाही अधिक बहुमताने निवडून दिले, असे मोदी यांनी सांगितले. अनेक दशकांनंतर देशाने एक मजबूत जनादेश दिला आहे. 2019 ला मिळालेला जनादेश हा पूर्णपणे पारखून देण्यात आला आहे. हा विजय म्हणजे सरकारने पाच वर्षात केलेल्या प्रामाणिक व यशस्वी प्रयत्नांची पावती आहे. त्यामुळेच सरकारला पुन्हा सत्तेत येण्याची संधी दिली आहे. कोण हरल कोण जिंकल याचा मी विचार करत नाही. तर यापलीकडे जाऊन देशवासीयांचे स्वप्न पूर्ण कसे करायचे याचा विचार करत असतो. देशभरातील जनतेने आमच्यावर इव्हीएमचे बटण दाबूनच विश्वास ठेवला आहे.

ज्यांचे कोणी नाही त्यांचे सरकार आहे. आमच स्वप्न मोठं होणे नाही तर जनतेशी नाते जोडणे हे आहे. महामार्ग, उडाण, स्टार्टअप, चांद्रयानमुळे देशाची आधुनिकीकरणाकडे वाटचाल झाली आहे. तळागाळातील जनतेशी नाते जोडून देशाचा विकास साधन आमच ध्येय आहे. सरकारमध्ये असलो तरी विरोधकांची स्तुती करण्याच आम्हाला वावडे नाही. आम्ही कोणाचही योगदान नाकारत नाही. आणीबाणीवरून काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, 44 वर्षांपूर्वी 25 जून रोजी लोकशाही व माध्यमांना पायदळी तुडवण्यात आले होते. सत्तेसाठी काँग्रेस सरकारने देशाला बंदीशाळा बनवले होत. आणीबाणीचा हा डाग मिटणारा नाही. मात्र आता जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलो आता देशाला बळकट करण्यासाठी लढण्याची वेळ आहे. महात्मा गांधींसह देशासाठी झटणारे आमचे आदर्श आहेत.

काँग्रेसने महिला सशक्तीकरणाच्या अनेक संधी गमावल्या आहेत. आता महिला सशक्तीकरणासाठी आम्ही तीन तलाक विधयेक आणले आहे. काँग्रेसने धर्म आणि राजकारणाशी हा मुद्दा जोडू नये, 35 वर्षानंतर त्यांना पुन्हा महिला सशक्तीरणाला पाठिंबा देण्याची संधी मिळाली आहे, असेही मोदी म्हणाले. मुस्लीमांच्या विकासाची जबाबदारी काँग्रेसची नाही, असे वक्तव्य एका काँग्रेसच्या मंत्र्यांने केल्याचे मोदी म्हणाले. त्यानंतर काँग्रेस खासदारांनी गोंधळाला सुरुवात केली. त्यानंतर याबाबतची लिंक पाठवू असे मोदींनी काँग्रेस खासदरांना सांगितले.