पाणीपुरवठा होऊनही धुळेकर तहानलेलेच; खोदकामात नळजोडण्या तुटल्या

1285

सामना प्रतिनिधी । धुळे

धुळे शहरात सध्या सुरू असलेले भूमीगत गटारीचे काम, नागरिकांसाठी नसून खोळंबा आणि होऊन अडचण, असे म्हणण्याची वेळ आली आहे. देवपूरातील दोंदे कॉलनी आणि टागोर कॉलनी शेजारून गटारीचे पाईप टाकण्यासाठी जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करण्यात आले. पण, खोदकाम करताना जेसीबी चालकाने या भागातील अनेक नळजोडण्या तोडल्या. सुमारे आठ दिवसांनंतर या भागात गुरूवारी पाणी पुरवठा झाला होता. पण, त्याचवेळी नळजोडण्या तुटल्यामुळे धुळेकरांना तहानलेलेच राहावे लागले.

धुळे महापालिका प्रशासनातर्फे 7 जुन पासून शहरात 150 कोटी रुपये खर्चाचे भूमीगत गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक एक अर्थात नगराबारीपासुन भूमीगत गटारीसाठी पाईप टाकण्याच्या कामास सुरूवात झाली. जेसीबी यंत्राच्या मदतीने रस्त्याच्या मध्यभागी चारी खोदण्यात येत आहे. बुधवारपासून देवपुरातील गजानन कॉलनी, टागोर कॉलनी, दोंदे कॉलनी या भागात चारी खोदून पाईप टाकण्याच्या कामास सुरूवात झाली. पण, गुरूवारी दोंदे कॉलनी आणि टागोर कॉलनीच्या दरम्यान खोदकाम करतांना जेसीबी यंत्र चालकाने बेदरकारपणे खोदकाम केले. त्यातुन अनेक नागरिकांच्या नळ जोडण्या तुटल्या. टागोर कॉलनीजवळ खोदकाम करतांना मुख्य चार इंच व्यासाची जलवाहिनी देखील फोडली. काम सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर या भागात सुमारे आठ दिवसानंतर पाणी पुरवठा झाला होता. पुरेशा दाबा अभावी नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होतो. ज्यावेळी पाणी पाहोचण्याची वेळ आली त्याचवेळी बाहेर नळजोडण्या तुटल्या. त्यामुळे नळाचे पाणी नागरिकांच्या घरी असलेल्या बादल्यांमध्ये पडण्या ऐवजी रस्त्यावरवाहु लागले. साहजिकच नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

ठेकेदाराचे फावले
महापालिकेचा कुठलाही कर्मचारी आणि काम घेणाऱ्या ठेकेदाराचा जबाबदार कर्मचारी उपस्थित नव्हता. उलटपक्षी खोदकाम करणाऱ्या मजुरांनी तुटलेल्या जलवाहिन्यांमधील पाणी उपसतांना आनंद घेतला. यावेळी अनेक नागरिकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांवर कुठलाही परिणाम झाला नाही. जलवाहिन्यांचे नुकसान होवु नये यासाठी खोदकाम करतांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा कर्मचारी किंवा व्हॉल्वमन उपस्थित का राहत नाही. शहरात दररोज पाणी पुरवठा होत नाही मग किमान हानी होण्याच्या काळात तरी कर्मचाऱ्यांनी सक्रिय रहायला हवे, असे म्हणत या भागातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा उध्दार केला.

आपली प्रतिक्रिया द्या