भाजपविरोधात जनतेत संतापाची लाट

8

सामना प्रतिनिधी । सांगली

भाजपने जनतेला खोटी आश्वासने देऊन केंद्र व राज्यात सत्ता मिळवली. राज्य शासनाने फसवी कर्जमाफी देऊन बोगस धनादेशाचे वाटप केले आहे. आता सर्व स्तरांवरील जनतेचा भ्रमनिरास झाला असून, भाजप विरोधात संतापाची लाट परसली आहे. यामुळे काँग्रेसने राज्यभर जनआक्रोश मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या मेळाव्याची सांगता ८ नोव्हेंबरला सांगलीत होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगलीत होणाऱया पश्चिम महाराष्ट्राच्या जनआक्रोश मेळाव्याच्या नियोजनासाठी सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱयांची बैठक सांगलीत पार पडली. या बैठकीला डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मोहनराव कदम, आमदार आनंदराव पाटील, महापौर हारुण शिकलगार, जयश्री पाटील, शैलजा पाटील, डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, राज्यातील भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. त्याचा काही उपयोग झाला नाही. देशातील दोन कोटी बेरोजगारांना नोकऱया देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र, दोन लाख तरुणांनादेखील रोजगार मिळालेला नाही. राज्य शासनाने शेतकऱयांसाठी कर्जमाफी जाहीर केली. मात्र, ही कर्जमाफी फसवी ठरली आहे. कर्जमाफीत मोठा घोळ झाला आहे. बोगस धनादेशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप डॉ. कदम यांनी केला.

सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाच हजार कोटींची तरतूद करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ अडीचशे कोटींची तरतूद केली आहे. भाजप सरकार फसवे आहे. निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. समाजातील कोणताही घटक आज सुखी नाही. त्यामुळे आता काँग्रेसने जनआक्रोश मेळावे सुरू केले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा सांगली जिह्यात होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी केंद्रीय व राज्यपातळीवर पक्षाचे नेते मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या