स्वातंत्र्यदिनी कश्मीरमध्ये राष्ट्रगीताचा अवमान

26

सामना ऑनलाईन। श्रीनगर

देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच कश्मीरमधील श्रीनगर येथे मात्र मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील बख्शी स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना त्याच्या सन्मानार्थ अनेकजण उभेच राहीले नाहीत. त्यांचे हे कृत्य राष्ट्रगीताचा अवमान करणारे असल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी कश्मीरमधील श्रीनगर येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अठरा हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था असलेल्या बख्शी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होता. देशाचा स्वातंत्र्यदिन असल्याने मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमास उपस्थित राहतील असे अपेक्षित होते. पण अवघ्या तीन हजार लोकांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने अर्ध्यापेक्षा अधिक स्टेडियम रिकामेच होते. मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, आमदार, खासदार व अनेक राजकीय व्यक्तींसह उच्च अधिकारी यावेळी हजर होते.

मुफ्ती यांच्याहस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत वाजवण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ या सर्व व्यक्तीं उभ्या राहिल्या. पण स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या तीन हजार लोकांपैकी अनेकजण जागेवरच बसून गप्पा मारत होते. ज्या देशात आपण राहतो त्याच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहण्याचे साधे सौजन्य या मुजोर कश्मीरी नागरिकांनी दाखवले नाही. यामुळे स्वातंत्र्यदिनी कश्मीरमध्ये पहिल्यांदाच परेडमध्ये सामील झालेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनात इतक्या अल्पसंख्येने लोकांनी सहभाग घेणे आणि राष्ट्रगीताचा अवमान करणं ही निराशाजनक बाब असल्याचं उत्तर प्रदेश पोलिस उपाध्यक्ष शिवदान सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या