पुण्यातही सातशे चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकत करमाफी द्या

42
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । पुणे

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई, ठाणे या महापालिकांतील नागरिकांना ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना सरसकट मिळकत कर माफ केला आहे, तर ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करात सवलत देणार आहे. त्याबाबतचा ठराव मुबई महापालिकेने मंजूर केला आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही ७०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकत करमाफी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन देण्यात आले. शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, शहर संघटिका सविता मते, संगीता ठोसर, नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्रमोदनाना भानगिरे, नगरसेविका पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, शहर उपप्रमुख आनंद गोयल, किरण साळी, संजय मोरे, संतोष गोपाळ आदी उपस्थित होते. मिळकत करमाफीसाठी पालिकेत जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

राज्य सरकार ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा विचार करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने पुणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये. ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करावा, पुणेकरांना करमाफी द्यावी, अशा मागण्या महापौरांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

कायमस्वरूपी आरोग्यप्रमुख नेमावा
शहरात स्वाइन फ्लू, गॅस्ट्रो, डेंग्यू, रेबीज या साथीच्या आजारांमुळे पुणेकर नागरिक त्रस्त झाले आहेत. भाजपची पालिकेत एकहात्ती सत्ता असताना कायमस्वरूपी आरोग्यप्रमुख नाही यासारखे दुर्दैव नाही. पुणेकरांची गैरसोय टाळण्यासाठी त्यामुळे येत्या ३० मार्चपर्यंत कायमस्वरूपी आरोग्यप्रमुख नेमावा; अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.

‘स्थायी’ला दिला प्रस्ताव
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातही ७०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकत कर माफ करावा, असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि विशाल धनवडे यांनी स्थायी समितीला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या