रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शैलेश सुर्वे (वय 40) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याठिकाणी तैनात असलेल्या महिला पोलीसाने प्रसंगावधान दाखवत शैलेश यांच्या हातातील रॉकेलचा कॅन हिसकावून घेत त्यांना आत्महत्येपासून रोखले. जमीन विकण्याच्या व्यवहारावरून हिस्सेदारांमध्ये वाद होता. त्या वादातून आलेल्या नैराश्याने शैलेश यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथे राहणारे शैलेश सुर्वे यांना गवळीवाडा येथील 25 गुंठे ज़मीन विकासकाला विकायची होती. मात्र, त्यामध्ये 11 सहहिस्सेदार होते. अन्य सहहिस्सेदारांनी ज़मीन विकासकाला देण्यास विरोध केला होता. मे 2019 मध्ये हे प्रकरण तहसीलदारांकडे आले होते. जुलै 2019 रोजी तहसीलदार यांनी त्यावर सुनावणी घेतली होती. अन्य सहहिस्सेदारांचा विरोध असल्याने तुम्हाला तुमच्या वाट्याची ज़मीन विकता येईल, असे तहसीलदारानी सांगितले होते. तरीही सहहिस्सेदारांमधील वाद सुरूच होता.

या वादामुळे शैलेश निराश झाले होते. या नैराश्यातून त्यांनी गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयालयाच्या आवारात स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी कामावर असलेल्या महिला पोलीस लतिका मोरे यांनी प्रसंगावधान दाखवत सुर्वे यांच्या हातातील रॉकेलचा कॅन हिसकावत त्यांना आत्महत्येपासून रोखले. तसेच त्यांनी शहर पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या