एकाच घरात होते दोन कट्टर शत्रूपक्षांचे समर्थक, वाचा सोमनाथ चॅटर्जी यांचा जीवनपट

सामना ऑनलाईन । कोलकाता

ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांचं १३ ऑगस्ट रोजी निधन झालं. ते लोकसभेचे माजी सभापती होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे ते एक प्रमुख नेते होते. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही राजकीय होती. त्या राजकीय पार्श्वभूमीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन कट्टर विरोधी पक्षाचे समर्थक एकाच घरात राहत होते. तरीही त्यांनी स्वतंत्रपणे आपलं राजकीय स्वातंत्र्य जपलं होतं. सोमनाथ चॅटर्जींच्या जीवनपटात या सशक्त अशा राजकीय-कौटुंबिक वातावरणाचा मोठा वाटा आहे.

सोमनाथ चॅटर्जी यांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी बंगाली ब्राह्मण असलेल्या निर्मलचंद्र चॅटर्जी यांच्या घरी तेजपूर, आसाम येथे झाला. त्यांच्या आईचं नाव वीणापाणि देवी होतं. निर्मलचंद्र चॅटर्जी हे प्रतिष्ठीत वकील आणि अखिल भारतीय हिंदू महासभेच्या संस्थापकांपैकी एक होते. सोमनाथ चॅटर्जी यांचे शिक्षण कलकत्ता आणि इंग्लंडमध्ये झालं. इंग्लंडच्या मिडल टेम्पलमधून कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी राजकारणात यायचा निर्णय घेतला.

त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९६८मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सोबत केली. २००८पर्यंत ते या पक्षाशी जोडलेले होते. १९७१मध्ये पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले. यानंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. तब्बल १० वेळा ते लोकसभा सदस्य म्हणून निवडले गेले होते. १९७१पासून त्यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून काम केलं. २००४मध्ये १४व्या लोकसभेत ते दहाव्यांना निवडून आले. १९८९ ते २००४मध्ये ते लोकसभेत सीपीएमचे नेते म्हणूनही कार्यरत होते. १९९६मध्ये चॅटर्जी यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कारही मिळाला.

४ जून २००४ रोजी ते लोकसभेच्या सभापतीपदावर सर्वसमंतीने निवडून आले. त्यांच्या नावाच्या प्रस्तावाला सर्व पक्षाच्या सदस्यांनी समर्थन दिलं. चॅटर्जी उत्तम वक्ते होते. कामगार आणि वंचितांच्या प्रश्नांना ते अतिशय प्रभावी वक्तृत्वाची जोड देऊन मांडत असत. उत्कृष्ट वाक्पटू, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची सखोल जाण, भाषेवर असलेलं प्रभुत्व आणि भाषणातली नम्रता या गुणांमुळे ते संसदेत लोकप्रिय झाले होते. लोकसभेचं २४ तास लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी लोकसभा या चॅनेलची सुरुवातही चॅटर्जी यांच्याच प्रयत्नाने झाली. हिंदुस्थानच्या संसदीय वारशाला जपण्यासाठी अतिशय अत्याधुनिक असं संसद संग्रहालय निर्माण करणं ही सुद्धा त्यांचीच संकल्पना होती. १४ ऑगस्ट २००६ रोजी या संसद संग्रहालयाचं उद्घाटन केलं गेलं.

असे उत्कृष्ट वक्ते, संसदपटू, नेते असलेल्या सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनामुळे हिंदुस्थानच्या संसदीय इतिहासातला एक अध्याय समाप्त झाल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

एक प्रतिक्रिया