किटक नाशकामुळे मृत्यू, एसआयटीची स्थापना

22

सामना प्रतिनिधी । नागपूर

यवतमाळ जिल्हयातील १८ शेतकरी व शेतमजुरांचा कापूस आणि सोयाबीन पिकांवर किटक नाशकाची फवारणी करताना झालेल्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीच्या या विशेष चौकशी पथकाचे काम सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत ९ व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती यवतमाळ जिल्हाधिकारी ,पुणे येथील कृषी विभागाचे आयुक्त तसेच कृषी सचिव यांनी मंगळवारी नागपूर खंडपीठाला दिली.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रूपये तर जखमींना प्रत्येकी ५ हजार रूपये आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आली आहे. किटक नाशक किरकोळ विक्रेते, व्यापारी यांच्याविरूध्द ३०४ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शेतक-यांना चार हजार आठशे बेच्याळीस कीट्स वाटण्यात आल्या आहेत. यासर्व कीट्स १ हजार आठशे अठ्ठयाणव ग्रामपंचायतींमध्ये वाटण्यात आल्या. या फवारणीमध्ये आठशे अठ्ठावीस जण जखमी झाले आहे. तर २१ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी १९ जणांना २ लाख रूपये देण्यात आले आहे. उर्वरित दोन जणांना मदत नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीटी कॉटनवर बंदीची प्रक्रिया सुरू आहे. सहा कंपन्या तसेच सहा वितरक यांचा स्टॉक जप्त करण्यात आला आहे. साठ दिवसांसाठी ५ किटक नाशक औषधींवर बंदी आणली आहे. जनजागृतीचे अभियान सुरू आहे, अशी माहिती प्रतिवादींनी दिली आहे. याप्रकरणी दोन आठवडयानंतर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. किटक नाशकाच्या फवारणीमुळे शेत मजूर व शेतक-यांचा झालेल्या मृत्यूप्रकरणी जम्मू आनंद यांनी अ‍ॅड. अरविंद वाघमारे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या