वैद्यकीय प्रवेश अभ्यासक्रमांच्या निकालाचा घोळ; महाराष्ट्र सरकारविरोधात हायकोर्टात याचिका

वैद्यकीय प्रवेशाच्या अभ्यासक्रमांच्या निकालाच्या घोळाचा मुद्दा अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पुण्यातील विद्यार्थिनीने यासंदर्भात महाराष्ट्र सरकार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय आणि सीईटी सेलविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याची नोंद घेत न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने याचिकेवर सोमवारी सुनावणी निश्चित केली आहे. गट ब अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांची घोषणा 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या वैद्यकीय प्रवेशाच्या गट अ अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीच्या निकालांपूर्वीच करण्यात आली आहे. यावर याचिकेतून आक्षेप घेण्यात आला आहे.

याचिकाकर्ती पूर्वा वाघ ही विद्यार्थीनी वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छित आहे. तिला अभ्यासक्रमांच्या निकालातील घोळाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. वैद्यकीय प्रवेश अभ्यासक्रमांच्या निकालाच्या घोषणेत मोठा घोळ घालण्यात आला असून त्याचा फटक बसून मला वैद्यकीय प्रवेशाची संधी गमावावी लागली आहे, असा दावा तिने केला आहे. पूर्वा वाघ हिने वकील राहुल कामेरकर यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिला गट अ अभ्यासक्रमांच्या निकालात प्रवेश मिळाला आहे. तथापि, गट अ अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीचा निकाल गट अ निकालापूर्वी जाहीर करण्यात आल्याने पुढील फेरीत सहभागी होण्यास मनाई केली गेली आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

याप्रकरणी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेतली आणि सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. तिसऱ्या फेरीतील प्रवेश आधीच पूर्ण झाल्याची माहिती सीईटी सेलच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली. त्याची नोंद घेत न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी निश्चित केली.