धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत, पर्यावरणाचे संरक्षणही महत्त्वाचे! आरेतील कृत्रिम तलावांचा आढावा घेण्याचे आदेश

आम्हाला कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत, पण पर्यावरणाचे संरक्षणही महत्त्वाचे आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले. गणेश विसर्जनासाठी आरेमध्ये पुरेसे कृत्रिम तलाव आहेत की नाहीत याचा आढावा येथील देखरेख समितीने घ्यावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. गणपती विसर्जनासाठी आरेमध्ये पुरेसे कृत्रिम तलाव आहेत की नाहीत याचा आढावा घेण्याची जबाबदारी तेथील देखरेख समितीची आहे. आरेमध्ये एक की सहा कृत्रिम तलाव असावेत किंवा एका ट्रकातील कृत्रिम तलाव पुरेसा होईल याचा निर्णय समितीने घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेने याचिका केली आहे. गेल्या वर्षी आरेमध्ये सात कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. या वर्षी केवळ एकच कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे, असा दावा परिषदेने केला. मात्र नुकतेच गौरी-गणपतींचे विसर्जन आरेतील कृत्रिम तलावात झाले. काहीच अडचण आली नाही, असे वनशक्ती या सामाजिक संघटनेने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. या वर्षी एका कृत्रिम तलावासह सात ट्रकांमध्येही कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे महापालिकेने न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले.