भोंदूबाबांची दुकानदारी बंद करा, सर्वाेच्च न्यायालयात याचिका ह सरकारला लक्ष घालण्याचे निर्देश

594
supreme_court_295

देशभरात अनेक भोंदूबाबा आश्रम चालवत आहेत. या आश्रमांमध्ये महिला कारागृहासारख्या अवस्थेत राहतात. आरोग्याची कोणतीही काळजी याठिकाणी घेतली जात नाही. त्यामुळे असे आश्रम, आध्यात्मिक केंद्रे बंद करण्यात यावीत अशी मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून केंद्र सरकारला यात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

आंध्रप्रदेशातील सिवंâदराबाद येथील डुम्पाला रामरेड्डी यांनी ही याचिका दाखल केली आहे. वीरेंद्र देव दीक्षित, आसाराम बापू तसेच गुरमीत राम रहीम सिंह यांच्यासह अनेकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काहींना शिक्षा झाली असून काही अटकेत आहेत. मात्र त्यांचे निकटवर्तीय अजूनही आश्रम चालवत आहेत. देशभरात भोंदूबाबांची कमी नाही. त्यांच्या आश्रमात तसेच आध्यात्मिक केंद्रात आरोग्याचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. याठिकाणी राहणाऱ्या महिलांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे हे आश्रम तसेच आध्यात्मिक केंद्र बंद करण्यात यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अमेरिकेतून शिकून आलेली आपली मुलगी दिल्लीतील एका अशाच आश्रमात फसली असल्याची कैफियतही रामरेड्डी यांनी सांगितली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आज सुनावणीसाठी आली. केंद्र सरकारने यात लक्ष घालावे असे निर्देश खंडपीठाने दिले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दोन आठवड्यात सरकारची बाजू मांडावी असेही खंडपीठाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या