
देशातील भीषण गॅस टंचाई आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीवरून आज लोकसभेत प्रचंड खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य करताना थेट पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यावर एपस्टीन फाईल्सच्या मुद्द्यावरून टीका केली. “स्वतः पेट्रोलियम मंत्र्यांनीच कबूल केले आहे की, ते एपस्टिनचे मित्र आहेत,” असे विधान राहुल गांधी यांनी करताच सभागृहात मोठा गदारोळ झाला.
कोणाकडून तेल किंवा गॅस खरेदी करायचा हे आता अमेरिका ठरवणार का? – राहुल गांधी
राहुल गांधी यांनी इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या गंभीर परिणामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, या युद्धाचा हिंदुस्थानवर व्यापक परिणाम होत असून गॅसच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. “कोणत्याही देशाचा पाया हा त्याची ऊर्जा सुरक्षा असते. मात्र आपण कोणाकडून तेल किंवा गॅस खरेदी करायचा हे आता अमेरिका ठरवणार का? रशियाकडून तेल घ्यायचे की नाही हे अमेरिका सांगणार का? आपण अमेरिकेच्या शब्दावर तेल खरेदी करणार का?” असे सडेतोड सवाल त्यांनी उपस्थित केले.
जगातील २० टक्के तेलाची वाहतूक होणारी होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद असल्याने उद्भवलेल्या परिस्थितीवर राहुल गांधींनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्याची गॅस टंचाई ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. “आम्हाला रशियाकडून तेल घेण्यापासून कोणी रोखले? हा एकप्रकारे समझोता (कॉम्प्रोमाईज) आहे,” असा आरोप त्यांनी केला.
























































