‘पीएफआय’च्या सदस्यांचा अल कायदा, इसिसशी संबंध; महाराष्ट्र एटीएसचा कोर्टात खळबळजनक आरोप

दहशतवादी कारवायांशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) पाच आरोपींच्या एटीएस कोठडीत सत्र न्यायालयाने सोमवारी 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. एटीएसने त्यांची कोठडी वाढवून मागताना काही खळबळजनक आरोप केले. पीएफआयच्या सदस्यांचे अल कायदा, इसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांशी लागेबांधे असल्याची दाट शक्यता आहे, असा दावा एटीएसच्या वतीने ऍड. सोलिन घोन्साल्विस यांनी केला. याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्याची दखल घेत न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत आठ दिवसांची वाढ केली.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) संपूर्ण देशभरात पीएफआयविरुद्ध धडक कारवाई करीत छापेमारी केली आहे. यादरम्यान महाराष्ट्रातून 20 जणांना अटक करण्यात आली. त्यातील पाच आरोपींना सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यापुढे हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने आरोपींच्या दहशतवादी कारवायांतील कथित सहभागावर बोट ठेवत युक्तिवाद केला. आरोपींवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी पक्षाने पाचही आरोपींच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ मागितली. आरोपींचे अल कायदा, इसिस, सीआयए आणि मोसाद यांसारख्या दहशतवादी संघटनांशी काय संबंध आहेत, याचा आम्हाला सखोल तपास करायचा आहे. यासंबंधी आरोपींकडून लॅपटॉप, फोन, सीडी असे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत. तसेच ‘हू किल्ड करकरे’ यांसारखी पुस्तके सापडली आहेत, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. त्यावर बचाव पक्षाने आक्षेप घेतला. आरोपींचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे सिद्ध करणारा कुठलाच पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. आरोपींची अटक कायद्याला धरून नाही, असा दावा करीत बचाव पक्षाने कथित सीडी आणि आक्षेपार्ह साहित्य सादर करण्याबाबत औपचारिक अर्ज केला. त्यावर या घडीला कथित सीडी व संबंधित साहित्य सादर करण्याबाबत आदेश देऊ शकत नाही, असे न्यायाधीशांनी नमूद केले. यादरम्यान आरोपीने कोणताही कबुलीजबाब देण्यास नकार देत अर्ज केला. यावेळी न्यायालयाने केस डायरी विचारात घेतली आणि तपास अधिकारी आरोपींकडून जप्त केलेल्या रेकॉर्डस्च्या आधारे आणखी तपास करू शकले असते, असे मत नोंदवून न्यायालयाने आरोपींच्या एटीएस कोठडीत आठ दिवसांची वाढ केली.

आरोपीच्या अटकेनंतर सोशल मीडियाचा पासवर्ड कसा बदलला?

या प्रकरणात पेशाने वकील असलेल्या कुरेशी सादिक शेखलाही अटक करण्यात आली आहे. त्याचे वकील मोहम्मद इब्राहिम यांनी सुनावणीदरम्यान एटीएसवरच संशय घेतला. आरोपीला त्याच्या घरातून पहाटे चार वाजता अटक करण्यात आली. त्याने केवळ आरोपींना कायदेशीर मदत पुरवली तसेच त्याच्याजवळ काही पुस्तके सापडली म्हणून त्याला ताब्यात घेतले आहे. वास्तविक त्याच्या अटकेनंतर सोशल मीडियातील पासवर्ड कसा काय बदलला गेला, असा सवाल ऍड. इब्राहिम यांनी केला. नेमका पासवर्ड कधी बदलला त्याची तारीख व वेळेची माहिती सोशल मीडिया कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाला (कम्युनिकेशन) निर्देश द्या, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. तसेच एटीएसने कुठल्याही थेट पुराव्याशिवाय आरोपींना या प्रकरणात नाहक गोवले आहे, असा दावा अन्य दोन आरोपींचे वकील ऍड. समशेर अन्सारी यांनी केला.