मोठी बातमी : पीजी मेडिकल मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर

सामना ऑनलाईन । मुंबई

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पीजी मेडिकल मराठा आरक्षण विधेयक गुरुवारी विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने पीजी मेडिकल मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून ते सभागृहात मांडले. त्यांनतर बहुमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

याआधी 30 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यात मराठा समजाला आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने लागू केला होता. एसईबीसी अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 2 नोव्हेंबर रोजी हे आरक्षण लागू केल्याचा दावा करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेडिकल पीजी प्रवेश प्रक्रियेत 16 टक्के मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. यानंतर राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. आता या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर झाले आहे.