फोनपे कस्टमर केअरच्या नावाने 99 हजार रुपयांची फसवणूक

1070

लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. अशीच एक घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे घडली आहे. फोनपेच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तिची 99 हजार 837 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात मारोती गोविंदराव दापके (42, रा. विकास नगर उदगीर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, फोनपे केअर सेंटरच्या 2 वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून त्यांच्याशी संभाषण करण्यात आले. यावेळी फिर्यादीच्या मोबाईलमध्ये त्याच्याच नावाने आयडी तयार करायला लावला आणि त्यांच्या उदगीर येथील एसबीआय बँकेच्या शाखेतील खात्यातून चार वेळा एकूण 99 हजार 837 रुपये पाठवण्यास सांगितले.

या दोन्ही मोबाईल क्रमांकावरून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे दापके यांनी ते पैसे पाठवले. दापके यांनी पाठवलेली रक्कम पुन्हा खात्यावर पाठवण्याचा बहाणा करून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दोन अज्ञात मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या