हिमाचलचा फोटोग्राफर चरसची तस्करी करताना सापडला

18

सामना प्रतिनिधी । मुंबई

थर्टी फर्स्टच्या तोंडावर नशेबाजांच्या मागणीनुसार मनाली क्रिम हा महागडा चरसचा साठा गोव्याला घेऊन निघालेला हिमाचलचा ड्रग्ज तस्कर मुंबईत पोलिसांच्या हाती लागला. येथे तो एकाला भेटून गोव्याला निघणार तेवढ्यात अमली पदार्थ कक्षाच्या घाटकोपर युनिटने त्याच्यावर झडप घालून 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा साडेसहा लाखांचा चरस साठा जप्त केला.
हिमाचलमधला एक ड्रग्ज तस्कर चरसचा साठा घेऊन मुंबईत आला आहे. तो चुनाभट्टी येथील प्रियदर्शिनी बसस्टॉपजवळ येणार असल्याची खबर घाटकोपर युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक शशांक शेळके व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून लीलामनी रोलिराम चौहान ऊर्फ चुन्नी (38) याला पकडले.

चुन्नी हा हिमाचलच्या मणिकरण येथील रहिवासी असून व्यवासायाने फोटोग्राफर आहे, पण त्याचबरोबर तो मनाली क्रिम या महागडया चरसची डिलेव्हरीदेखील करतो. चुन्नीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ साडेसहा लाख किमतीचा चरस साठा मिळाला. हा चरस साठा तो गोव्याला घेऊन जाणार होता. हिमाचलहून तो रेल्वेने मुंबईत आला. येथे तो एका इसमाला भेटला. त्यानंतर तो गोव्याला जाणार होता, पण मुंबईतून सटकण्याआधीच त्याला पकडल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. चुन्नी मुंबईत कोणाला भेटला याचा आता आम्ही शोध असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या