फोटोग्राफी तुमचं करिअर आहे का? मग कुंडलीत सापडतील योग

342
kundali-photography

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई ( ज्योतिष, वास्तु विशारद)

आजकाल कॅमेरा सर्वांच्या हातात दिसतोय. सोमवार ते शुक्रवार ऑफिसच्या ताणातून मुक्तता मिळावी म्हणून सुट्टीच्या दिवशी “Professional Camera”ने फोटोग्राफी करताना बरीच मंडळी दिसतात. छंद म्हणून फोटो टिपणे वेगळे आणि प्रशिक्षण घेऊन “Professional Photographer” होणे वेगळे. मला असं वाटतं की Professional Photographer होण्यासाठी खालील गोष्टी नैसर्गिकरित्यातच त्या व्यक्तिमध्ये असाव्यात. – सौंदर्यदृष्टी, Passionate, Patience, सर्वांशी मिळूनमिसळून बोलण्याची खुबी.

ह्यासाठी माझ्याकडे येणाऱ्या फोटोग्राफर्स मंडळींच्या आणि इतर काही फोटोग्राफेर्सच्या कुंडलींचा एकत्रित अभ्यास करता मला ग्रहयोगांमध्ये साम्य आढळले. ते काय हे आज तीन-ते चार कुंडल्यांमार्फत आपण पाहणार आहोत.

ह्या कुंडल्यांपैकी एक कुंडली आहे प्रसिद्ध फोटोग्राफरची (अर्थात नाव इथे देत नाही )- ह्या फोटोग्राफरला कमी वयात भरपूर प्रसिद्धी मिळाली. –

१) कर्क लग्न आणि धनु राशीची कुंडली आहे. चंद्र शुक्राच्या पूर्वाषाढा नक्षत्रात आहे. शुक्र स्वतः दशमात (कर्म स्थानात ) सूर्याबरोबर युतीत आहे. दशम स्थानातील शुक्र तो ही सूर्याबरोबर. करिअरमध्ये प्रसिद्धी मिळाली ती राहूच्या महादशेत. सौंदर्यदृष्टीसाठी शुक्र आणि राहूने मदत केलीच,परंतु patience वाढवण्यांत मंगळाची आणि शनिची जोड मिळाली. शुक्र केतूच्या नक्षत्रात आणि केतू पंचम स्थानांत. पंचम स्थान हे फोटोग्राफीसाठी पूरक आहे. पंचम स्थानाचा मूळ कारक ग्रह आहे रवि. रवि किंवा सूर्य ह्याला आत्माकारक संबोधले आहे. तुमचा आत्मा, तुमचे स्व कशात लपले आहे हे पहाण्यासाठी कुंडलीतील रवि मदत करू शकतो. ह्या कुंडलीत रवि दशम स्थानात असून तो ही केतूच्या नक्षत्रात आहे. एकूणच काय फोटोग्राफर तर होणारच परंतु प्रसिद्धीचे योग कुंडलीत आहेत.

२) दुसरी कुंडली आहे माझ्याकडे येणाऱ्या एका जातकांपैकी – हा फोटोग्राफर आहेच परंतु त्याचे स्वतःचे फोटोग्राफीचे इंस्टिट्यूटही आहे. वृषभ लग्नाची कुंडली. लग्नेश शुक्र षष्ठ स्थानांत तो ही स्वतःच्याच ‘तूळ’राशीत. ह्या कुंडलीत शुक्र मंगळाच्या ‘चित्रा’ नक्षत्रात. चित्रा हे नक्षत्र सुद्धा व्यक्ति ‘आर्टिस्ट’ आहे हे दर्शवून देतं. मग ही कलाकुसर फोटोग्राफी, फॅशन गार्मेंट्स,मातीचे किंवा दगडाचे स्कल्प्चर्स इ. ह्यांत दिसून येते. ह्या व्यक्तिचीही करिअरची सुरवात राहूच्याच महादशेत. राहू हा ग्रह कलाकारांसाठी अत्यंत शुभ ठरतो. कारण राहू म्हणजे प्रभाव. जे मुळात नाही ते दाखवण्याची कला ‘राहूच’ करू शकतो. टी. व्ही. किंवा नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना स्वतःला विसरून एखादे दुसरेच ‘व्यक्तिमत्त्व’ सादर करावे लागते. तत्प्रमाणे फोटोग्राफरचे. त्याला फोटो काढतांना खुबीने व्यक्तिचे दोष लपवून त्याचे सौंदर्य कसे फोटोत उठून दिसेल ह्यांवर लक्ष केंद्रित करावे लागते.

ह्या कुंडलीत रवि स्वतःच्याच सिंह राशीत असून तो शुक्राच्या नक्षत्रात आहे. ही व्यक्ति स्वतः फोटोग्राफी शिकवत असल्याने ह्या व्यक्तिच्या कुंडलीतील बुध आणि गुरु ह्या ग्रहांनीसुद्धा त्याला मदत केली आहे. गुरु ग्रह कुंभ राशीत दशम स्थानात स्वतःच्या नक्षत्रात आणि बुध शुक्राच्या नक्षत्रात आहे. एकूणच फोटोग्राफी आहेच परंतु इंस्टिट्यूट सांभाळण्यासाठी ह्या ग्रहांची जोड मिळाली.

३) तिसरी कुंडली आहे एका जातकांपैकीच – ही फोटोग्राफर असून फोटोग्राफीचे क्लासेस घेते आणि लग्न – समारंभ (Event Photography )अशा फोटोग्राफीमध्ये प्रसिद्ध आहे. Event Photography कठीण असावी असा माझा अंदाज कारण इतर फोटोग्राफीत मॉडेलचे फोटो चांगले न आल्यास पुन्हा त्या मॉडेलचे फोटो काढणे शक्य होते परंतु लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुडा, गेट टुगेदर इ. वेळी फोटो चांगले न आल्यास पुन्हा तसेच फोटो काढणे शक्य होत नाही कारण समजा नवरीने हार नवरदेवाला घातला परंतु फोटो काढताच आला नाही तर पुन्हा हार गळ्यातून काढून फोटो काढणे शक्य नाही. म्हणून अशा वेळचे फोटो घेताना लक्ष केंद्रित असावे लागते.

ह्या कुंडलीत लग्नेश शुक्र लग्नातच तो ही बुधाच्या युतीत असून रविच्या नक्षत्रात. रवि शुक्राच्या नक्षत्रात. करिअरची सुरवात झाली आहे बुधाच्या महादशेत आणि प्रसिद्धी मिळाली शुक्राच्या महादशेत. सध्या ‘Pre wedding’ फोटोजची क्रेझ आहे. ह्या Pre Wedding फोटोशूटच्या कामांतही व्यक्ति व्यस्त असते.

४) चौथी कुंडली आहे मुंबईतील प्रसिद्ध फोटोग्राफरची. वृषभ लग्न आणि वृषभ राशीची कुंडली. रवि मेष राशीत. मेष ही राशी रविसाठी पूरक आहे. ह्या राशीत रवि उच्चीचा आहे. प्रसिद्धी मिळाली ती शनिच्या महादशेत. शनि हा ग्रह शुक्राच्या लग्नांसाठी (शुक्राच्या दोन राशी – वृषभ आणि तुळ ) भाग्योदयकारक ठरतात. शनिच्या १९ वर्षांच्या महादशेत काम आणि प्रसिद्धी भरपूर मिळली. हे मुद्दाम सांगण्याचे कारण की शनि महादशा वाईट,कष्टकारक असं समजणाऱ्यांसाठी उदाहरण. मधल्याकाळात प्रसिद्धीमुळे ‘फिल्म’ इंडस्ट्रीतूनही कामासाठी विचारणा झाली परंतु ह्या व्यक्तिने फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यास नकार दिला. फिल्म इंडस्ट्रीसाठी राहू आणि मंगळ ह्या ग्रहांची जोड असावी लागते परंतु ह्या कुंडलीत ह्या दोन्ही ग्रहांची साथ नसल्याने ह्या व्यक्तिने ह्या इंडस्ट्रीत जाणे टाळले असावे असे वाटते.

एकूणच शुक्र,रवि आणि राहू ह्या ग्रहांचा कुंडलीवरचा प्रभाव आणि पूरक महादशा असतील तर फोटोग्राफीमध्ये नक्कीच करिअर होऊ शकेल आणि प्रसिद्धीही मिळू शकेल. शुक्र हा मुळातच सौंदर्यदृष्टी देणारा ग्रह,रवि प्रसिद्धी आणि तुम्ही ‘Passionate’ असण्यासाठी मदत करतो. तर राहू हा जनसामान्य लोकांना दिसतांना काय (सौंदर्य) दिसले पाहिजे आणि काय(दोष ) दिसू नये ह्यांसाठी पूरक ठरतो.

तुमच्याही कुंडलीत असे योग असल्यास तपासून पाहा. कदाचित तुमचे करिअर सुद्धा फोटोग्राफीत असू शकेल.

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

summary: how your kundali helps you to find out career in photography

आपली प्रतिक्रिया द्या