व्यायामाशी मैत्री

सध्या दिवस गुलाबी थंडीत धावण्याचे आहेत. धावणे एक परिपूर्ण व्यायाम प्रकार. पण बऱ्याचदा एखाद्या प्रतिकूल घटनेमुळे संपूर्ण व्यायामालाच दोषी ठरविले जाते. तंत्रशुद्ध, सातत्याने केलेला व्यायाम हे निरोगी जीवनशैलीचे लक्षण आहे.

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली… स्त्री रोगतज्ञ डॉ. राकेश सिन्हा यांचे मॅरेथॉनचा सराव करताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन… खरे पाहता ‘फुलोरा’च्या मुख्य लेखाची सुरुवात अशी करायला मला अजिबात आवडत नाही… पण या बातमीमागचे वास्तव एक व्यायामप्रेमी म्हणून मांडणे मला अत्यंत गरजेचे वाटले… आपल्या लेखाचे शीर्षकच आहे व्यायामाशी मैत्री… ज्याप्रमाणे मैत्रीची व्याख्या ही कोणत्याही सीमेच्या पलीकडे असते… तिला कोणत्याही सरधोपट गोष्टीत बांधता येत नाही त्याचप्रमाणे व्यायामाची व्याख्या तर संपूर्णपणे केवळ आणि केवळ आरोग्याशीच निगडित आहे… आणि आरोग्य हे केवळ व्याधी, विकारापासून दूर राहणे यापुरते मर्यादित असू शकत नाही… त्यामुळे व्यायाम म्हणजे केवळ एखाद्या स्पर्धेचा सराव, जाड किंवा बारीक होणे किंवा आपल्या रोजच्या जगण्यातील एक केवळ स्टेटस सिम्बॉल होऊच शकत नाही… व्यायाम म्हणजे एक अत्यंत आरोग्यदायी, निरामय जीवनशैली… ही जीवनशैली मिळवण्यासाठी, प्राप्त करून घेण्यासाठी तिची सातत्याने साधना करावी लागते… होय, साधनाच असते ती… निरामय जीवनाची… ताणविरहित जगण्याची… आरोग्यपूर्ण जीवनशैली कायमची प्राप्त करून घेण्यासाठी सातत्याने, निष्ठsने केलेली साधना… नेहमीच जीवनदायी ठरणारा व्यायाम एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण कसे होऊ शकतो?

व्यायाम याचा अर्थ आपल्या शरीराची काळजीपूर्वक ठरवून, सुसूत्रपणे करण्यात येणारी एक लयबद्ध हालचाल. ज्यामध्ये शिस्त असते, सौंदर्य असते… सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातत्य असते. आपल्यासाठी असंख्य व्यायाम प्रकार उपलब्ध असतात जे सहजपणे करता येतात… सध्या दिवस धावण्याचे आहेत… मॅरेथॉनचे आहेत.. त्यामुळे अनेकजण उत्साहाने धावण्याचा सराव करताना दिसतात. मुंबईत घेतली जाणारी मॅरेथॉनची स्पर्धा ही तर जागतिक स्तरावर प्रतिष्ठsची समजली जाते. त्याच्यासाठी अनेकजण सराव करत असतात. ४२ किलोमीटर म्हणजेच पूर्ण मॅरेथॉन, २१ किलोमीटर म्हणजे अर्ध मॅरेथॉन. शिवाय १० किलोमीटर, ५ किलोमीटर असे कमी अंतरही असते. पण ४२ आणि २१ किलोमीटर अंतर धावण्यासाठी नियमित सरावाची आणि योग्य आहाराची नितांत आवश्यकता असते.

मुळात धावणे हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार. अत्यंत परिपूर्ण व्यायामप्रकार. पण आपल्याकडे एखाद्या चांगल्या गोष्टीवर टीका करण्यासाठी सगळेच सरसावलेले असतात आणि यात डॉक्टर्सही मागे राहत नाहीत. वजने घेऊन व्यायाम, धावणे, आहारातील आरोग्यदायी खाद्यपदार्थ उदा. तूप, भात, ठरावीक फळे या काही गोष्टी वैद्यकतज्ञांकडून नेहमीच बाद ठरविल्या जातात. मग भलेही त्या कितीही उपयुक्त आणि आरोग्यदायी असोत. धावणे या व्यायाम प्रकाराला अशाच प्रकारच्या टीकेचा आणि गैरसमजुतींचा नेहमीच सामना करावा लागतो.

एखाद्या प्रतिकूल घटनेमुळे संपूर्ण व्यायामालाच दोष न देता व्यायामाचे, आहाराचे, विश्रांतीचे योग्य गणित मांडावे. धावणे किंवा कोणताही व्यायामप्रकार हा आनंददायीच ठरेल यात शंकाच नाही.

धावण्याचे फायदे

एखादी प्रतिकूल घटना घडली की सरसकट व्यायामाला दोषी ठरविले जाते. व्यायामशाळेला दोषी ठरविले जाते. असंख्य चुकीचे समज पसरविले जातात.

सकाळची सुरुवात धावण्याने केल्यास अख्खा दिवस ताजातवाना आणि प्रसन्न जातो.

धावण्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. श्वसनाचे विकार बरे होतात.

आपल्या शहराची जरा धावून वेगळ्या तऱहेने ओळख करून घ्या.

धावण्यातील अमुक एक टप्पा गाठल्यानंतर स्वतःतील क्षमतेचा शोध नव्याने लागतो.

रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रोल नियंत्रित राहते.

धावण्याच्या सरावादरम्यान स्ट्रेचिंग, पोटाचे व्यायाम करणे अत्यंत जरुरीचे ठरते. कारण धावताना आपल्या शरीराचे सर्वाधिक वजन पोटावर आणि पाठीवर येत असते. त्यामुळे मार्गदर्शकाच्या सल्ल्याने संपूर्ण व्यायामाची आखणी करून घ्यावी.

डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्यावी. जेणेकरून आपल्या वाढलेल्या शारीरिक क्षमतेचा शोध लागून आपला आत्मविश्वास उंचावतो.

कोणताही व्यायामप्रकार करताना तज्ञांचे मार्गदर्शन अगदी आवर्जून घ्यावे. थोडे पैसे स्वतःवर खर्च केले तरी चालतात हे नेहमी लक्षात ठेवावे.

आपली प्रतिक्रिया द्या