दिव्यांग मुलांनी बनवल्या सुबक गुढी

प्रतिकात्मक छायाचित्र

सामना ऑनलाईन, धुळे

हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. पाडव्याच्या दिवशी घरांवर गुढी उभारून नवनिर्मितीचा ध्यास घेतला जातो. तेव्हा ध्यास घेणाऱ्यांसाठी धुळे शहरातील सन्मती विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आकर्षक गुढ्यांच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. मखमली कापडाची गुढी उभारून त्यावर तांब्याचा कलश रोवला जात आहे. गुढीच्या कपड्यावर आकर्षक किनार आणि रंगी-बेरंगी टिकल्यादेखील लावल्या जात आहेत. त्यामुळे भरजरी वस्त्राने गुढी उभारण्यात आली आहे, असा भास होतो.

वाडीभोकर रोडलगत असलेल्या सन्मती विद्यालयात बहुसंख्य दिव्यांग मुले-मुली शिक्षण घेतात. या मुलांमध्ये शिक्षणासोबत कला-कौशल्येदेखील त्यांना अवगत व्हावे यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांकडून निरनिराळ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आकर्षक वस्तूंची निर्मिती केली जात आहे. गुढी-पाडव्यानिमित्त सध्या गुढीची प्रतिकृती तयार करून घेतली जात आहे. आकर्षक पाटावर लाकडी दांडा ठेवून त्यावर भरजरी वस्त्राप्रमाणे वस्त्र तयार करून त्याची गुढी उभारली जात आहे. खरोखरच्या गुढीसारखी दिसणारी छोटीशी गुढी दिवाणखान्यात आकर्षक ठिकाणी असावी असा मोह पाहताक्षणी अनेकांना होतो. शिवाय गुढी पाडव्यानिमित्त परस्परांना शुभेच्छा देताना त्या गुढ्या भेट स्वरूपात दिल्या जातात. त्यामुळे सन्मती विद्यालयात गुढ्यांची मागणी वाढली आहे.

सध्या पाचशेहून अधिक गुढ्या तयार करण्यात येत आहेत. पाडव्यासाठी गुढ्या तयार करताना दिवाळीत आकर्षक भेटकार्ड, पणत्या, निरनिराळय़ा प्रकारची कृत्रिम फुले, आकर्षक पायपुसण्या हे विद्यार्थी तयार करतात. शिक्षण घेतांनाच त्यांना आर्थिक स्वावलंबनाचे धडेदेखील मिळतात, असे साधना साळवे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या