तुरीला 30 टक्के क्षेत्रावर मर, वांझ रोगांचा फटका; राज्यातील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र वाढत असले तरी यंदा सततच्या बदलत्या वातावरणामुळे तुरीवर वांझ आणि मर रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात साधारण तीस टक्के म्हणजे तीन ते साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राला या रोगाचा फटका बसून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भासह वीस जिल्ह्यांत तुरीचे क्षेत्र अधिक आहे.

राज्यात 20 वर्षांपूर्वी 10 लाख 96 लाख हजार हेक्टर तुरीचे पीक होते. त्यात वाढ होऊन यंदा राज्यात तुरीचे 12 लाख 75 हजार 971 हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा 13 लाख 35 हजार 135 हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी 12 लाख 38 हजार 297 हेक्टरवर पेरणी झाली होती. गतवर्षीपेक्षा यंदा एक लाख हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे. राज्यात वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलडाणा, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर, जालना, सांगली, नगर, सोलापूर, जिल्ह्यांत तुरीचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. गेल्यावर्षी हेक्टरी उत्पादन कमी म्हणजेच 12 लाख 80 हजार 153 टन तुरीचे उत्पादन झाले. यंदाचे उत्पादन पीक पाहणी प्रयोगातून स्पष्ट व्हायचे आहे.

कृषी विभागाकडून तक्रारी झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभाग व कडधान्य सुधार प्रकल्पाच्या अधिकारी, शास्त्रज्ञांनी प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राची पाहणी केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते नगर जिल्ह्यासह राज्यात तीस टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर मर आणि वांझ रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, सोलापूर नगरसह पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

विद्यापीठातील प्रक्षेत्रावरही रोगांचा प्रादुर्भाव

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एन. एस. कुटे म्हणाले की मर आणि वांझ रोगांबाबत कृषी विभागाकडून तक्रारी आल्यानंतर वनस्पती रोगशास्त्र विभाग, कडधान्य सुधार प्रकल्पाच्या शास्त्र्ाज्ञांनी पाहणी केली असून, वस्तुस्थितीचा अहवाल कृषी विभागाला दिला आहे. मर, वांझ रोगांमुळे यंदा तुरीच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

खोडवा घेऊच नका – डॉ. नरूटे

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. तानाजी नरुटे म्हणाले, अनेक भागांत शेतकरी तुरीचा खोडवा घेतात. मात्र, यंदा वातावरणातील सातत्याने होणारा बदल यामुळे बुरशीचा मोठा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे तुरीवर वांझ रोग पडला आहे. पाण्यातूनही या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कोळी प्रवर्गातील विषाणूच्या प्रादुर्भावाने मर रोगाचे प्रमाण अधिक आहे. पिकांत फेरपालट करून तुरीच्या जागी कडधान्याचे पीक घेऊ नये. तुरीचा खोडवा घेतला तरी हा विषाणू कायम राहतो. त्यामुळे तुरीची मुळे जाळून टाकणे गरजेचे आहे.