पिंपरीतील शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच, महापालिका आयुक्तांचा निर्णय

दिवाळीनंतर कोरोना साथीचे रुग्ण वाढू लागले आहेत. तसेच शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली नसल्याने पिंपरी – चिंचवड शहरातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार नाहीत. 30 नोव्हेंबरपर्यंत शहरातील शाळा बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सोमवार (दि. 23) पासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, स्थानिक प्रशासनाने शहरातील कोरोना साथीची परिस्थिती पाहून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या होत्या. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई, पुणे महापालिकेने शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन पिंपरी – चिंचवड महापालिकेने केले होते. महापालिका हद्दीत नववी ते बारावीपर्यंतच्या महापालिका आणि खासगी अशा २८२ शाळा आहेत. त्यात महापालिकेच्या नववी ते दहावीच्या 18 आणि 6 उर्दू अशा 24 शाळा असून 4 हजार 490 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर, 229 शिक्षक कार्यरत आहेत. संपूर्ण शहरात पहिली ते बारावीपर्यंतच्या 658 शाळा आहे. त्यामध्ये नववी ते बारावीच्या वर्गात 92 हजार 842 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या वर्गांसाठी 4 हजार 900 शिक्षक अध्यापनाचे काम करतात. शिक्षकांची कोरोनाची चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यातच दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.
————————
”शाळा सुरू करण्याची तयारी या कालावधीत सुरू राहील. त्यामध्ये अध्यापन व शिक्षकेतर कर्मचाNयांची कोविड चाचणी, पालकांची संमती घेणे आणि सामाजिक अंतर, हात स्वच्छता, शाळा वाहतूक अंमलबजावणी आणि निर्जंतुकीकरण यासाठी शालेय पायाभूत सुविधा तयार करणे या गोष्टींचा समावेश असेल. कोरोना साथीची परिस्थिती आणि शाळांच्या सज्जतेचा आढावा घेऊन या निर्णयाचा ३० नोव्हेंबर रोजी पुन्हा विचार केला जाईल.’’ – श्रावण हर्डीकर (महापालिका आयुक्त)

आपली प्रतिक्रिया द्या