चेंबर साफ करताना पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

19

सामना प्रतिनिधी । पिंपरी

काळेवाडी येथील चेंबर साफ करताना दुर्गंधीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. भारत भीमराव डावकर (३५) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर संजय मातंग (वय ४०) असे बेशुद्ध कर्माचाऱ्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली

मातंग व डावखरे पालिकेचे कंत्राटी कर्मचारी आहेत. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते दोघे ‘ड’ प्रभागाअंतर्गत असलेल्या काळेवाडी येथील एका गॅस एजन्सी समोर असलेला चेंबर साफ करत होते. चेंबर साफ करत असताना चेंबरमधील दुर्गंधीमुळे ते दोघे चेंबरमध्येच बेशुद्ध पडले. हे चेंबर दहा ते बारा फुट खोल आहे.

स्वच्छता कर्मचारी चेंबरमध्ये बेशुद्ध पडले असल्याचे बाहेरून लक्ष ठेवणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. नागरिक त्वरित त्यांच्या मदतीसाठी धावले. अग्निशमन दलाला याची माहिती दिली. एका कर्मचाऱ्याला नागरिकांनी चेंबरमधून बाहेर काढले. त्यानंतर आलेल्या पिंपरी पालिकेच्या अग्निशमन जवानांनी दुसऱ्या कर्मचाऱ्याला बाहेर काढले आहे. दोन्हीं कर्मचाऱ्यांना औंध येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यातील एका कर्मचाऱ्याचा उपचारपूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दुसऱ्या कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या