‘खाकी’तील आगळा वेगळा पैलू, अमेरिकेत अडकलेल्या वडिलांच्या मेसेजची पोलीस आयुक्तांनी घेतली दखल; चक्क..

1212

लॉक डाऊनमुळे अमेरिकेत अडकलेल्या वडिलांनी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे वडिलांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना याबाबत ई-मेल पाठवून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची विनंती केली. पोलिसांनीही या ई-मेलची दखल घेत रविवारी सायंकाळी त्या मुलाच्या घरी जाऊन केक कापत शुभेच्छा दिल्या. या अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या वाढदिवसामूळे ‘खाकी’तील आगळा वेगळा पैलू समोर आला आहे

वत्सल शर्मा असे वाढदिवस साजरा करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वत्सल यांचे वडील व्यवसायानिमित्त अमेरिकेत गेले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यामुळे सध्या ते अमेरिकेतच अडकून पडले आहेत. रविवारी त्यांचा मुलगा वत्सल याचा वाढदिवस होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना आपल्या मुलाला शुभेच्छा देता येत नव्हत्या. यामुळे त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना ई-मेल पाठवून आपला मुलगा वत्सल यास शुभेच्छा देण्याची विनंती केली.

पोलीस आयुक्तांनी हा मेसेज हा सांगवी पोलिसांना पाठविला. सांगवी पोलिसांनीही मग वत्सल याच्या वाढदिवसाची जोरदार तयारी केली. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पोलीस पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत असलेल्या वत्सलच्या घरी गेले. तिथे त्यांनी वत्सलच्या वडिलांचा वाढदिवसाचा मेसेज त्यास दिला. तसेच त्यास खाली पार्किंगमध्ये बोलावून पोलिसांच्या गाडीवरच केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी सोसायटीतील नागरिकही सहभागी झाले.

अत्यंत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा झाल्याने वत्सल अक्षरशः भारावून गेला होता. त्याने आपले वडील तसेच संपूर्ण पोलीस दलाचे आभार मानले. ‘आपल्या आयुष्यातील हा वाढदिवस आपण कधीही विसरणार नाही’, अशी भावना त्याने पोलिसांशी बोलताना व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या