पिंपरीत करोनाबाधित व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संचार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाचावर धारण

691
फाईल फोटो

अत्यावश्यक सेवेत येणारे आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यासाठी एका व्यावसायिकाने पिंपरी चिंचवड शहरातील एका पोलीस ठाण्यात चकरा मारल्या. ‘तो’ व्यावसायिक आता कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील काही परिसर सील केला आहे. मात्र, आपला व्यवसाय जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येत असल्याने आपल्याला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळावी, या मागणीसाठी एक व्यावसायिक शहरातील संबंधित पोलीस ठाण्यात आला होता. त्याने परवानगी मिळावी, यासाठी अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या भेटीगाठी घेतल्या.

बुधवारी आलेल्या काही जणांच्या अहवालात त्या व्यावसायिकाचा देखील अहवाल आहे. त्यात तो व्यवसायिकही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची पाचावर धारण बसली आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या