बेहरामपाड्यात पाइपलाइन फुटली; झोपड्यांमध्ये पाणी घुसले, चिमुकले बहीण–भाऊ वाहून गेले

10

सामना ऑनलाईन, मुंबई

जलवाहिनी फुटून हजारो-लाखो लिटर्स पाणी वाया जाण्याच्या घटना मुंबईला नवीन नाहीत, पण आज बेहरामपाड्यात फुटलेल्या जलवाहिनीने दोघा चिमुकल्या बहीण-भावाचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेमुळे जलवाहिन्यांलगतच्या झोपड्यांचा आणि जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

का फुटली जलवाहिनी?
मरोळ-मरोशीपासून माहीम रूपारेल ते रेसकोर्सपर्यंतच्या जलबोगद्याचे काम आज सकाळपासून जल अभियंता विभागाने हाती घेतले होते. त्यामुळे वैतरणा जलवाहिनीवरचा दाब वाढल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आज पाणीपुरवठा पूर्ववत
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरा पूर्ण होईल आणि उद्यापासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती एच-पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बाजूची संरक्षक भिंतही तोडावी लागली.

झोपड्यांना नोटिसा
उच्च न्यायालयाने जलवाहिन्यांलगत १० मीटरपर्यंतच्या झोपड्या हटवण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. त्याअंतर्गत येथील ४०० झोपड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली.

पाइपलाइनची नियमित देखभाल केली नाही
पाइपलाइनची नियमित देखभाल केली नसल्यानेच ही दुर्घटना झाली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. अन्य जलवाहिन्यांच्या परिसरात अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.  – अलिम खान, शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक

  • नेमके काय घडले 
  • वांद्रे टर्मिनस, बेहरामपाड्याजवळ ७२ इंची वैतरणा जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला खेटून दुतर्फा अनेक झोपडय़ा आहेत. जलवाहिनीतून गळती होणारे पाणी भरण्यासाठी झोपडपट्टीवासीयांची येथे नेहमीच झुंबड उडते.
  • आज सकाळी ही जलवाहिनी फुटली. पाण्याचा दाब आणि प्रवाह एवढा जबरदस्त होता की प्रवाहात विघ्नेश डोईफोडे या आठ महिन्यांच्या बाळासह त्याची नऊ वर्षांची बहीण प्रियांका हे दोघेही वाहून गेले.
  • 2017-07-07-photo-00000003-dती भावाला मांडीवर घेऊन खेळवत होती…

जलवाहिनी ज्या ठिकाणी फुटली त्याच्या जवळच डोईफोडे यांची झोपडी होती. प्रियांका आपल्या लहान भावाला मांडीवर घेऊन जलवाहिनीवर बसली होती आणि इतक्यात जलवाहिनीच्या मॅन होलचे झाकण उडून पाण्याचे उंच फवारे प्रचंड दाबाने उडाले. या दुर्घटनेत दोन्ही भावंडांना जबर मार बसला व त्यातच त्यांचे प्राण गेले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या