मीन

446

‘सागराच्या पोटात अनेक मौल्यवान वस्तू आहेत, सौंदर्य आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडतात. तसेच मनुष्याच्या जीवनाचे असते. ग्रहांची साथ आहे. आताच तुम्ही जीवन सागरातून नवा मार्ग शोधू शकाल.’

जीवन हे अथांग आहे अनमोल आहे आणि अस्थिर. कष्ट संपले. आता आनंदाचे क्षण अनुभवा. दुःखानंतर सुख असतेच. ग्रहांचा खेळ चालूच असतो. ग्रहांची साथ आहे. प्रयत्नांचा वेग वाढवा आणि जीवनातील मौल्यवान क्षण वेचा व साठवा. पुढे उपयोगी पडतील. दिवाळी नव्या उमदेची असेल. खडतरपणा संपलेला आहे. लक्ष्मी-कुबेर पूजन व दिवाळी पाडवा या दिवशी तणाव होऊ शकतो. तरीही मनोभावे पूजन होईल. भाऊबीजेच्या दिवशी शुभ समाचार मिळेल. धंद्याचे स्वरूप बदलेल. समोरून तुमच्यासाठी योजना येतील. नवी दिवाळी नवा आरंभ होईल. वर्षभर गुरू महाराज कन्या राशीत म्हणजे मीनेच्या सप्तस्थानात वास्तव्य करणार आहेत. तुमची ध्येयपूर्ती होईल. संतती सुख लाभेल. २६ जाने. २०१७ ला शनि धनु राशीत प्रवेश करीत आहे. जून ते ऑक्टोबरमध्ये शनि वक्री स्थितीत राहील. २६ ऑक्टोबर २०१७ ला शनि मार्गी होऊन धनु राशीत येईल. तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत करेल. भाग्योदय होईल.

१८ ऑगस्ट २०१७ ला कर्क राशीत राहू व मकर राशीत केतु प्रवेश करीत आहे. राहू व केतूचे भ्रमण तुमच्या प्रगतीच्या आड येणार नाही. १२ सप्टेंबर २०१७ला तुला राशीत गुरूचे राश्यांतर होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमचे अधिकार वाढवतील. पेच, प्रसंग व कोर्ट केस मात्र या वर्षात संपवा. सुखाचे क्षण नेहमी कापरासारखे उडून जातात. योग्य चिंतन करा व उच्च ध्येयपूर्तीसाठी अमूल्य वेळ खर्च करा. चित्रपट, कला, क्रीडा सर्वच ठिकाणी तुमची उंची वाढणार आहे. सविस्तर भविष्य चर्चा पुढे पाहू या.

राजकीय-सामाजिक क्षेत्र:

मागील वर्षात थोडी माघार तुम्हाला घ्यावी लागली. राजकीय – सामाजिक क्षेत्रात आता तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्यावरील आरोप दूर करता येतील. नव्या उमेदीने योजना मार्गी लावता येतील. दर्जेदार परिचय होतील व त्यांचा सहवास मिळेल. आत्मविश्वासाने मोठे निर्णय घेता येतील. वरिष्ठांना तुम्हाला मदत करावी लागेल. जनतेच्या सुखासाठी चांगल्या योजना तयार करता येतील.

तरुण-तरुणींसाठी विविध उपक्रम सुरू करता येतील. डिसें., जाने, फेब्रु. नवीन कार्याचा आरंभ करा. मान-सन्मानाचा योग येईल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. दौऱयात विशेष यश मिळेल. लोकप्रियता वाढवता येईल. डिसें.मध्ये संताप वाढेल. मार्च, मे व जूनमध्ये अडचणीवर मात करावी लागेल. कोर्ट केस मात्र जुलैपर्यंत मिटवून टाका.

नोकरी – व्यवसाय:

सुगीचे दिवस शेतकऱयाला येतील. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. नोव्हे. ते फेब्रु.च्या दरम्यान तुमच्या कामात फायदा होईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. परदेशी जाण्याची संधी मिळेल. व्यवसायातील अडथळे कमी झाल्याने धंद्याचा विस्तार शक्य होईल. मेहनतीला चांगले फळ येईल. फेब्रु., मार्च व ऑगस्टमध्ये किरकोळ अडथळे येतील. जिद्द ठेवा, संयम ठेवा. यश मिळेल. एप्रिल, मे, जुलै, सप्टे.मध्ये नोकरी-व्यवसाय याला कलाटणी मिळेल. विशेष संशोधन कार्यात यश मिळेल. जीवनसाथीचे सहकार्य मिळाल्यामुळे नोकरी-व्यवसायात पुढे जाता येईल. थोरा-मोठय़ांच्या मदतीने मोठे कंत्राट मिळवता येईल.

विद्यार्थी व तरुण वर्ग:

शिक्षण व नोकरीतील अडचणी कमी होतील. कंपनीद्वारा परदेशाचा योग येईल. प्रेमाला चालना मिळेल. ऑक्टो., नोव्हें., फेब्रु., मार्चच्या परीक्षेत व कामात सावध रहा. जास्त मेहनत घ्या. डिसें., मे व ऑगस्टमध्ये रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात काळजी घ्या. कायद्याचा भंग करू नका. डिसें., जाने., एप्रिल ते जुलै तुमच्या क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळेल. मान-सन्मान, पुरस्कार व आर्थिक लाभ होईल. दर्जेदार व्यक्तींचा परिचय होईल.

महिला स्पेशल:

संसारातील व तुमच्या कार्यक्षेत्रातील समस्या सुटतील. नवा प्रगतीचा मार्ग मिळेल. दिवाळीपासून नवा छोटासा व्यवसाय सुरू करता येईल. कोर्टकचेरीचे प्रश्न लवकर संपवा. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारीकडे लक्ष द्या म्हणजे अधिक चांगले स्वास्थ मिळेल. पुढील वर्षीसाठी ते फायदेशीर ठरेल. ऑगस्टमध्ये पोटाचा आजार किंवा ऑपरेशन होण्याची शक्यता आहे. आप्तेष्ट व मैत्रिणी यांच्यातील दुरावा कमी होईल. घरात शुभ कार्य घडेल. तुमचा उत्साह वाढेल.

आपली प्रतिक्रिया द्या