भिवंडीत जिवंत काडतुसासह देशी कट्टा जप्त, तस्कराला बेड्या

देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या एका तस्कराला भिवंडी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. आकाश हजारे (24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून एक देशी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहरातील एसटी स्थानक परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एक जण देशी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस आयुक्त जगजित सिंह यांना मिळाली. त्यानुसार भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी पोलिसांचे विविध पथके बनवून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध सुरू केला. दरम्यान पोलीस पथकाने एसटी स्थानकाजवळ सापळा रचून आरोपीस अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 5 जिवंत काडतुसे आणि एक देशी कट्टा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 31 हजार 500 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने हा कट्टा कोणाला विकण्यासाठी आणला होता का, ही शस्त्रे घेऊन तो कोणावर हल्ला करणार होता का, याचा अधिक तपास पोलीस करीत आहे